शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका महिलेला सायबर गुन्हेगारांनी 2.45 कोटी रुपयांचा गंडा घातला. सायबर पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे एकाला अटक करण्यात यश आले.
संजय एम.चव्हाण (महाराष्ट्र) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी सासष्टी येथील एका महिलेला नुवामा वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंटचे स्टॉक ब्रोकर म्हणून भासवले आणि शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. यासाठी तिला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले. उच्च परताव्याचे खोटे आश्वासन देऊन, पीडितेला एकूण 2.45 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास सांगण्यास आले.
याबाबत तक्रार दाखल होताच सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी सुरू केली.यावेळी तक्रारदाराकडून 13.5 लाख रुपये जास्त परताव्याच्या बहाण्याने ज्या खात्यात जमा करण्यात आले होते, त्या खातेधारकाचा शोध लागला .त्याच्या आधार पोलिसांनी संजय एम. चव्हाण (45, महाराष्ट्र) याला अटक केली. उर्वरित संशयितांचा शोध घेतला जात आहे.
सायबर क्राइम पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मंदार गावकर देसाई, पोलिस कॉन्स्टेबल विराज नार्वेकर व अक्षय प्रभू वेर्लेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई पार पाडली. सायबर क्राइम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षत आयुष आणि पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
ऑनलाइन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार सायबर क्राइम पोलिस स्थानकात किंवा जवळच्या पोलिस स्थानकात करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.