Thursday, July 24, 2025
Homeमहाराष्ट्रदाम्पत्याने दोन मुलांसह जीवन संपवले

दाम्पत्याने दोन मुलांसह जीवन संपवले

दाम्पत्याने दोन मुलांसह जीवन संपवले पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील घटना कौटुंबिक कारणातून घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज अख्खे कुटुंब संपल्याने परिसरात हळहळ

 

कौटुंबिक वादातून पत्नीने लहान मुलांसह विहिरीत उडी मारून जीवन संपवले.ही माहिती समजताच पतीनेही घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपावली. ही घटना रविवारी (दि. 6) ऐन आषाढी एकादशीदिवशी कासेगाव (ता. पंढरपूर) येथे घडली. या घटनेत अख्खे कुटुंब संपले आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

 

कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी पत्नी मोनाली म्हमाजी आसबे (वय 25), सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षाची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत दुपारी 2.30 च्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. शेतात गेलेली मोनाली व मुले बराच वेळ झाले घरी आली नसल्याने पती म्हमाजी व कुटुंबीय शोधण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीच्या काठावर चपला दिसून आल्या. तेव्हा मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे स्पष्ट झाले. यानंतर दुसर्‍याच दिवशी सोमवारी पहाटे चार वाजता पती म्हमाजी शहाजी आसबे (35) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कासेगावातील शेतात जाऊन त्या विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केलेे. घटना घडल्यापासून सातत्याने विहिरीतले पाणी उपसणे सुरू आहे. मृतदेह शोधण्यात रात्री उशिरा एनडीआरएफला यश आले. दरम्यान, या कुटुंबाचा प्रमुख असलेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या म्हमाजी आसबे याचा मृतदेह पोलिसांनी खाली उतरवला. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

 

आई-वडिलांना मुलाच्या कुटुंबाचे दुःख

 

म्हमाजी आसबे यांची कासेगाव येथे शेती आहे. त्यांच्या द्राक्ष बागेतील विहिरीतच पत्नी मोनालीने तिच्या दोन चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केली आहे. म्हमाजी याच्या पश्चात केवळ आई व वडीलच राहिले आहेत. अख्खं कुटुंंब संपले आहे. या घटनेने कासेगावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -