देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी उद्या (9 जुलै) भारत बंदची हाक दिली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशावर जाणवणार आहे. उद्या 25 कोटींहून अधिक कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरोधात आंदोलन करणार आहेत. यामुळे सामान्य जनतेचे हाल होण्याची शक्यता आहे. या भारत बंददरम्यान काय सुरु आणि काय बंद राहणार याबाबत माहिती जाणून घेऊयात.
देशातील AITUC, HMS, CITU, INTUC, INUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. तसेच संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार आघाडी या शेतकऱ्यांच्या संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून या बंदला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मात्ऱ, भारतीय मजदूर संघ या बंदमध्ये सहभागी होणार नाही.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
कर्मचाऱ्यांनी सरकारकडे चार कामगार संहिता थांबवण्याची मागणी केली आहे. यात कामगारांना संघटना बनवण्याचा आणि संपावर जाण्याचा अधिकार देण्याची माहणी करण्यात आली आहे. 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांसाठी अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सरकारी रिक्त पदे भरण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच मनरेगाचे वेतन वाढवा आणि ते शहरी भागात वाढवा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि नागरी सेवा मजबूत करा अशी मागणीही या संघटनांनी केली आहे.
भारत बंदमुळे या सेवा विस्कळीत होण्याची शक्यता
बँकिंग आणि विमा सेवा
टपाल सेवा
कोळसा खाणकाम आणि औद्योगिक उत्पादन
सरकारी सार्वजनिक वाहतूक सेवा
सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सवर परिणाम होण्याची शक्यता
ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोर्चे निघणार, त्यामुळे नागरिकांवर परिणाम होणार
काय सुरु राहणार?
भारत बंद दरम्यान शाळा आणि महाविद्यालये खुली राहणार आहेत.
खाजगी कार्यालये
वैद्यकीय सेवा
रेल्वे सेवांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे गाड्या उशिराने धावण्याची शक्यता