सम्राटनगर येथील सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि देवकर पाणंद येथील ज्येष्ठ नागरिकास ११ कोटींचा गंडा घालणारी टोळी पुण्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या बँक खात्यांवरील ४८ लाख रुपये गोठवण्यात यश आले.
यातील काही आरोपींचा दोन्ही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांच्या चौकशीतून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
बंडू हरिबा राठोड (वय ३७, सध्या रा. चाकण, पुणे, मूळ रा. तुगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव), तेजस राहुल भालेराव (२१, रा. खोरवडे, ता. दौंड, जि. पुणे), विवेक उर्फ विकी भास्कर गवळी (२८, रा. तळवडे निगडी, पुणे), अक्षय रमेश कामठे (३०, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि क्षितिज चंद्रकांत सुतार (२४, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सुतार हा या टोळीचा प्रमुख असून, तोच ऑनलाईन फसवणुकीचे नेटवर्क चालवत होता. त्यांनी पुण्यात एका हॉटेलच्या खोलीत न्यायालय आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा सेटअप तयार केला होता. फसवणुकीतील रक्कम अटकेतील बंडू राठोड याच्या खात्यावर जमा झाली होती. ती पुढे अन्य खात्यांवर वळवण्यात आल्याचे तपासातून समोर आले. पुढील खातेधारकांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी तिघांची चौकशी सुरू
जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असून, गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. यातील एका संशयिताच्या बँक खात्याचा वापर राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातही झाला आहे. त्यावरून या दोन्ही टोळ्या एकमेकांशी संबंधित असल्याचे समोर आले.
४८ लाख गोठवले
राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २८ लाख आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० लाख असे एकूण ४८ लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित रक्कम पुढे अनेक खात्यांवर वर्ग झाली आहे. त्या खात्यांचा शोध घेऊन त्यावरील व्यवहार बंद करणे आणि रक्कम गोठवण्यासाठी बँकांशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांकडूनही चौकशी
ऑनलाईन फसवणुकीतील गुन्ह्यात टोळी प्रमुखासह इतरांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच आरोपींनी मुंबईतील काही नागरिकांना गंडा घातला आहे. त्याबाबत मुंबई पोलिसांनी कोल्हापुरात येऊन अटकेतील आरोपींची चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले.