आजोबांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. शर्वरी भिकाजी फराकटे (वय 17, रा. रायगड कॉलनी) असे या तरुणीचे नाव आहे. ही घटना सकाळी सव्वाअकरा वाजता घडली.
शर्वरीचे आजोबा हे भाजी विक्रेते असून, ते कामानिमित्त बाहेर गेले असता घरी कोणी नसल्याचे पाहून शर्वरीने घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. शर्वरीचे वडील भिकाजी फराकटे यांचे 2016 मध्ये निधन झाले. त्यानंतर शर्वरी व तिचा भाऊ आजोबांकडे राहत होते. तिने बुधवारी सकाळी आजोबांकडे मोबाईल मागितला होता.
शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी नकार दिला. गळफास घेतल्याची घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला सीपीआरमध्ये दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे आई, आजी, आजोबा व लहान भाऊ आहे.