गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मद्यप्रेमींसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.(alcohol)इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ने राज्य सरकारच्या करवाढीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून, दारूवरील करवाढ मागे न घेतल्यास राज्यातील परमिट रूम्स आणि बार बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांत राज्य सरकारने दारू विक्रीवरील व्हॅट ५% वरून १०% पर्यंत वाढवला आहे. त्यासोबतच, दारू परवान्याच्या शुल्कात १५% वाढ करण्यात आली असून उत्पादन शुल्कातही वाढ झाली आहे. AHAR चा दावा आहे की, या वाढीमुळे हॉटेल व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे आणि संपूर्ण उद्योगाला याचा मोठा फटका बसत आहे.
AHAR ने आपल्या निवेदनात सांगितले की, सरकारने जर दोन दिवसांत दारूवरील वाढवलेले कर मागे घेतले नाहीत, तर महाराष्ट्रातील बार आणि परमिट रूम्स बेमुदत बंद ठेवण्यात येतील. यामुळे गटारी अमावस्येसारख्या विशेष दिवशी हजारो ग्राहकांना नाराजीचा सामना करावा लागू शकतो.(alcohol)गटारी अमावस्या ही परंपरेनुसार अनेक ठिकाणी मद्यप्रेमींसाठी ‘विशेष दिवस’ मानली जाते. या दिवशी बारमध्ये गर्दी उसळते. मात्र, यंदा संपाच्या इशाऱ्यामुळे गटारीचा आनंद काहीसा मावळण्याची शक्यता आहे. सरकारने निर्णयात काही बदल केला नाही, तर या दिवशी बार बंद राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील बारमालकांनी संपाचा पवित्रा घेतल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांनीही AHAR च्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सरकारसमोर आता मोठं आर्थिक आणि सामाजिक दडपण निर्माण झालं आहे.(alcohol)गटारी अमावस्या अगोदर निर्णय झाला नाही, तर महसूल गमावण्याबरोबरच, कायदा-सुव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो, असा इशाराही या असोसिएशनने दिला आहे. आता लक्ष सरकारच्या भूमिकेकडे लागलं आहे. दोन दिवसांच्या अल्टीमेटमनंतर हा प्रश्न सुटतो की संप पेटतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.