Saturday, July 12, 2025
Homeमहाराष्ट्रवडिलांच्या निधनानंतर भारतात आले अन् राजकारणात सक्रिय झाले, जयंत पाटील राष्ट्रवादीत कसे...

वडिलांच्या निधनानंतर भारतात आले अन् राजकारणात सक्रिय झाले, जयंत पाटील राष्ट्रवादीत कसे आले?

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत खळबळ माजली आहे. जयंत पाटील राजीनामा देणार म्हणून अटकळी बांधण्यात येत होत्या.

 

दरम्यान जयंत पाटील यांच्या कारकि‍र्द देखील चर्चली जात आहे. राजाराम पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना शरद पवारांनी राष्ट्रवादीत घेतलं होते. त्यामुळे ते आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत.

 

जयंत पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यात झाला. त्यांचे वडील, लोकनेते राजाराम बापू पाटील, हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते होते. 1962 ते 1970 आणि 1978 मध्ये त्यांनी राज्यात मंत्रीपद भूषवले. मात्र, 1984 मध्ये राजाराम बापू यांचे अकस्मात निधन झाले. त्यावेळी जयंत पाटील अमेरिकेतील न्यूजर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सिविल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होते. वडिलांच्या निधनामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. या घटनेने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

 

जयंत पाटील यांनी राजकारणात पदार्पण शेतकरी कामगार पक्षातून (शेकाप) केले. त्यानंतर त्यांना शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आणले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी या पक्षात सक्रिय सहभाग घेतला. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्षाला महाराष्ट्रात मजबूत पायावर उभे केले. पक्षाच्या विस्तारात त्यांचा मोठा वाटा आहे.

 

1990 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी जयंत पाटील यांनी इस्लामपूर-वळवा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. गेल्या 30 वर्षांपासून ते या मतदारसंघाचे सात वेळा प्रतिनिधित्व करत आहेत, प्रत्येक वेळी 60 हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून येत आहेत. त्यांनी 1999 ते 2008 या काळात राज्याचे अर्थमंत्री म्हणून नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आर. आर. पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा जयंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद स्वीकारले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून काम केले.

 

जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक आधार मिळाला. सहकारी चळवळीतील त्यांचे योगदान आणि राजकीय कौशल्य यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी नेते म्हणून मान्यता मिळाली आहे.

 

जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि राजकीय उलथापालथीच्या काळातही त्यांनी पवार यांच्याशी एकनिष्ठ राहणे पसंत केले. त्यांच्या या निष्ठेमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे पक्षात त्यांचे स्थान अढळ आहे.

 

जयंत पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत स्थिरता आणि विश्वासार्हता दाखवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अनेक आव्हानांना तोंड दिले आहे. त्यांचे कार्य आणि लोकसंपर्क यामुळे ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तिमत्त्व बनले आहेत. त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -