जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलसह पारंपरिक भारतीय पादत्राणे तयार करणाऱ्या कारागिरांसोबत आता ‘प्राडा’ हा आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड भागीदारी करणार आहे. दोन आठवड्यांपूर्वीच प्राडाने मिलान मेन्स फॅशन वीकमध्ये कोल्हापुरी चप्पलची कॉपी असलेली पादत्राणे लाँच केली होती.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाल्यावर प्राडाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता कोल्हापुरी जागतिक पातळीवर आणखी दिमाखात पोहोचणार आहे.
प्राडाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससोबत एक बैठक घेतली. या बैठकीत भविष्यातील भागीदारीच्या शक्यतांवर चर्चा झाली, असे प्राडाने वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
पुढील टप्प्यात प्राडाच्या पुरवठा साखळी टीमकडून विविध पारंपरिक पादत्राण निर्मात्यांची भेट घेतली जाणार आहे, असे कंपनीने सांगितले. चेंबरने या ऑनलाईन बैठकीचे काही फोटो ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. यात म्हटले आहे की, आमची भागीदारी जागतिक फॅशन आणि पारंपरिक समुदायांमधील सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरू शकते. या चर्चेत प्राडा कंपनीच्या मालकांचे चिरंजीव लोरेंझो बर्टेली यांनीही सहभाग घेतला, असे चेंबरने सांगितले.
वाद का झाला?
प्राडाने दोन आठवड्यांपूर्वी मिलान फॅशन वीकमध्ये एक ओपन टो सँडल सादर केले. याला लेदर सैंडल असे संबोधले होते. पण भारतीय फॅशन तज्ज्ञ, कारागीर, बॉलीवूड कलाकार आणि काही राजकारण्यांनी यावर टीका केली. कारण ही चपल कोल्हापुरी चपलांची हुबेहूब नक्कल असल्याचे स्पष्ट दिसत होते. प्राडाने कोल्हापुरी चप्पल आपलेच असल्याचे भासवत लाँच केले. त्यामुळेच वाद उफाळला.
ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने प्राडाने सुरू केलेला संवाद महत्त्वपूर्ण टप्प्यावर आला असून, जगातील सर्वात मोठ्या ब्रँडची टीम कोल्हापुरात येऊन कारागिरांशी संवाद साधणार आहे. या महत्त्वपूर्ण घटनेमुळे कोल्हापुरी चप्पलबरोबरच हुपरीचे पैंजण, कोल्हापुरी साज, महाराष्ट्रातील पैठणी अशा उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळणार आहे.