खदानीत बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू
फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव बु. येथील खदानीत चार-पाच मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका किशोरवयीन मुलाचा शनिवारी (दि.१२) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने गावात शोककळा पसरली. राजदीप सुनील वाघ (१६) असे मृत मुलाचे नाव आहे.
बोधेगाव बु. येथील रहिवासी राजदीप सुनील वाघ (१६) हा शनिवारी सकाळी आपल्या आई वडिलांसोबत शेतात काम करायला गेला होता. दुपारी बारा वाजेच्या दरम्यान तो गावात आठवडे बाजार असल्याने आला असता त्याला त्याचे चारपाच मित्र भेटले आणि ते खदानीत पोहण्यासाठी गेले.
खदानीत पोहण्यासाठी गेल्यावर त्याला पोहण्याचा मोह आवरला नसल्याने त्याने पाण्यात उडी मारली राजदीपला पोहता येत नसल्याने तो पाण्यातून बाहेर आलाच नसल्याने मित्रांनी आरडाओरड केल्यावर जवळपास अर्धा तास कुणीच आले नाही. जवळपास अर्धा तासानंतर गावातील लोकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला संपूर्ण बेशुद्ध अवस्थेत फुलंब्री येथील उपजिल्हा ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
त्यानंतर त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह सायंकाळी नातेवाईकांना सोपविण्यात आला. रात्री आठ वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजदीप हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने गावातील सर्व नागरिक हळहळ व्यक्त करीत होते.