येथील मध्यवर्ती बसस्थानकात भरदिवसा एका महिला प्रवासीच्या पर्समधून २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी चार अनोळखी महिला चोरट्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत फरना आसिफ सनदी ( वय ४३ रा. कोल्हे मळा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फरनाज सनदी या १२ जुलै रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी बसस्थानकातून सांगलीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी तोंडाला ओढणी व स्कार्फ बांधलेल्या चार अनोळखी महिलांनी त्यांची वाट अडवून बसमध्ये चढण्यापासून अडथळा केला.
सनदी यांनी प्रतिकार केला असता चारही महिलांनी त्यांना घेराव घातला व त्यांच्या ताब्यातील बदामी रंगाची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला.