महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात एक खळबळजनक चर्चा सुरु आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही प्रकरणे निव्वळ हनी ट्रॅपची आहेत की अधिकाऱ्यांच्या रासलीला आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
या प्रकरणात नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची चर्चा आहे. हा प्रकार नाशिकमधील एका पंचतारांकित सुविधा असलेल्या हॉटेलमध्ये घडल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्यामुळे कोणीही अधिकारी किंवा नेता या ट्रॅपबद्दल उघडपणे समोर येण्यास तयार नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सध्या गुलदस्त्यात आहे.
कोणते मंत्री-अधिकारी हनी ट्रपमध्ये
मात्र, या प्रकरणामुळे नाशिकसह मुंबई आणि पुणे येथील बड्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचे पाहायला मिळत आहे. एका बड्या नेत्याने केलेल्या या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या हनी ट्रपमध्ये नेमके कोणते अधिकारी किंवा मंत्री अडकले आहेत, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हे प्रकरण केवळ वैयक्तिक संबंधांपुरते मर्यादित आहे की यामागे काही मोठे षडयंत्र आहे, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ
या घटनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे. संबंधित व्हिडीओ बाहेर आल्यास अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होण्याचीही चर्चा आहे. मात्र, या गौप्यस्फोटामुळे नाशिकपासून सुरू झालेली ही चर्चा आता राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, असं बोललं जात आहे. मात्र या प्रकरणाचे सत्य कधी समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.