पावसाळयात तुम्हीची किल्ले रायगडावर सफर करणार असाल तर आधी हि बातमी वाचा आणि मगच पुढचे नियोजन करा. हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर १५ ऑगस्टपर्यंत पायरी वाट मार्ग बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झालं असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. संभाव्य आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, या उद्देशाने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गडावर जाणारा पायरी मार्ग सर्व नागरिक, पर्यटकांसाठी प्रतिबंधित केल्याची माहिती दिली आहे. याबाबत लेखी आदेशही काढण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्याला मागच्या २-३ दिवसांत मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यातच किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, या मार्गावर पावसाचे पाणी वेगानं वाहत असल्यामुळे पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने वेळेत निर्णय घेत, पायरी मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.
पर्यटकांनी प्रशासनाशी सहकार्य करावं- Raigad Fort
पावसाळ्यामध्ये दगडी वारंवार पडण्याच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून दगडी पडून कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी होऊ नये, याकरिता किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पावसाळा ऋतू संपेपर्यंत बंद करण्यात यावा. व पर्यटकांना किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवेचा वापर करण्याबाबत प्रसार माध्यमांतून माहिती द्यावी, अशी विनंती उपविभागीय अधिकारी महाड यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली होती. त्यावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस पाऊले उचलत आता रायगडावरील पायरी वाट १५ ऑगस्टपर्यंत बंद केला आहे. तसेच पर्यटकांनी प्रशासनाशी सहकार्य करावं, असा आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मागील २ ते ३ दिवसापासून रायगड आणि महाडला मुसळधार पावसाने झोडपले आहे. रस्त्यांवर पाणी साचलं आहे, जनजीवन विस्कळीत झालं आहे. दक्षिण रायगड मधील म्हसळा तालुक्याला जोरदार पावसाने झोडपलं असून म्हसळा मधील ढोरजे पूल पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील प्रामुख्याने ज्या पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या नद्या आहेत त्या आंबा, कुंडलिका आणि सावित्री नदी या धोका पातळीपर्यंत पोहचल्या आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील ६ तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.