जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडला सेबीनं चार नव्या पॅसिव्ह गुंतवणूक योजना सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीनं बुधवारी सेबीच्या वेबसाईटवर जारी केलेल्या रेग्युलटरी फायलिंगसंदर्भात माहिती दिली. जिओ ब्लॅकरॉक निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फंडचा समावेश आहे. या योजनेनुसार ओपन-एंडेड फंड निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करण्यासह मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल. मिडकॅप सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुकीचा पर्याय मिळेल.
जिओ ब्लॅकरॉक निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंडचा फोकस निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्सवर केंद्रीत असेल. यामध्ये मार्केट कॅपच्या आधारे 51 ते 100 रँक दरम्यानच्या कंपन्यांचा समावेश असेल. हा गुंतवणूकदारांना भविष्यात लार्ज कॅपमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी मिळू शकते.
जिओ ब्लॅकरॉक निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंड देखील आणला जाणार आहे. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड निफ्टी स्मॉल कॅप 250 निर्देशांकाचा भाग असेल. ही योजना लाँग टर्म कॅपिटल ग्रोथची इच्छा असणाऱ्या आणि हाय रिस्क घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे.
जिओ ब्लॅकरॉक निफ्टी 8 ते 13 वर्ष जी-सेक इंडेक्स फंड ही चौथी योजना आहे. ही योजना दीर्घकालीन सरकारी गिल्ट्सला ट्रॅक करेल. याचा मॅच्युरिटीचा कालावधी 8 ते 13 वर्ष आहे. ही योजना निश्चित उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांसाठी असेल.
ब्लॅकरॉकनं या योजनांना इंडेक्स फंडच्या रुपात डिझाइन केलं आहे. हे फंड केवळ डायरेक्ट प्लॅन आणि ग्रोथ ऑप्शन या पर्यायात असेल. या योजनांमध्ये कोणताही एक्झिट लोड नसेल. गुंतवणुकीची किमान रक्कम 500 रुपये आहे. या सर्व योजनांद्वारे सेबीच्या निर्देशांचं पालन केलं जाणार आहे. प्रत्येक फंडची ऑफर एनएफओद्वारे सुरु होईल. ही ऑफर 3 ते 15 दिवस सुरु असेल. अद्याप याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक या जगातील सर्वात मोठ्या असेट मॅनेजमेंट कंपनीनं 50 टक्के समान भागीदारीत जिओ ब्लॅकरॉक या कंपनीची सुरुवात केली आहे. ही भागीदारी जुलै 2023 मध्ये झाली होती. मे 2025 पर्यंत म्युच्युअल फंड व्यवसाय सुरु करण्याची परवानगी यांना मिळाली होती. त्यानंतर जिओ ब्लॅकरॉकला गुंतवणूक सल्लागार आणि ब्रोकरेज फर्म म्हणून काम करण्यास परवानगी मिळाली आहे.