दक्षिण भारतातील आंध्रप्रदे, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यातून सोलापुरात नाराळाची आवक होते. यंदा उत्पन्न कमी झाल्याने आवकमध्ये मोठी घट झाली असून, याचा परिणाम नारळाच्या दरावर झाला आहे.
20 रुपयांना मिळणारा नारळ 40 आणि 50 रुपयांना मिळत आहे. ऐन आषाढी सणातच नारळाच्या किंमतीत दुप्पट वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.
आषाढ महिन्यातील यात्रा जत्रांच्या काळात नारळाची गरज जास्त असते. दरवाढ झाल्याने व्यापार्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. आषाढ महिना सुरू होताच सणांची रेलचेल वाढली असली, तरी सोलापूरकरांना यंदा नारळाच्या वाढलेल्या दराने चिंतेत टाकले आहे. यंदा दरांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे पावसाचे कमी प्रमाण, घटलेले पीक आणि यंदा नारळाच्या झाडांना मोठ्याप्रमाणात लागलेली कीड. यामुळे बाजारात नारळाचा पुरवठा कमी झाला असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. परिणामी, जे ग्राहक आधी चार नारळ खरेदी करत होते. ते आता केवळ दोन नारळांवर समाधान मानत आहेत. असे व्यापारी यांच्याकडून सांगण्यात आले. यासोबतच सणासुदीच्या काळात आवश्यक असलेल्या नारळाच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आवक वाढली
आषाढ महिन्यात नारळाला मोठी मागणी असल्याने, सोलापुरात नारळाची आवक वाढली आहे. या पंधरा दिवसांच्या हंगामात दररोज ट्रकमधून सुमारे 80 हजार ते एक लाख नारळ शहरात दाखल होत आहेत.
‘या’ राज्यातून नारळ आवक
सोलापूरमध्ये नारळाचा पुरवठा प्रामुख्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून येतो. ही राज्ये भारतातील प्रमुख नारळ उत्पादक राज्यांपैकी आहेत. येथून सोलापूरचा बाजारपेठेत विविध राज्यातून नारळाचा पुरवठा होतो.
– संजय बिराजदार, व्यापारीयंदाच्या वर्षी नारळाचे दर वाढले आहेत, कारण पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. थोडा विक्रीवर परिणाम झालेला आहे. वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांची खरेदी क्षमता कमी झाली आहे. ज्यामुळे व्यापार्यांवरही आर्थिक परिणाम होत आहे.- सुवर्णा माने, गृहिणीआषाढात प्रत्येक सणाला नारळ लागतोच. पण आता एक नारळ 50 रुपयांना मिळत असेल तर आम्ही सण कसे साजरे करायचे. गेल्यावर्षी सहा नारळ घेतली होती. यंदा मात्र दोनच नारळ घेऊन सण साजरा केला.