पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या २४ तासांच्या आत अटक करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनैतिक संबंधातून चारित्र्यावर संशय घेऊन प्रेयसीचा गळा आ-वळून खून करणाऱ्या प्रियकराला उमरगा पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले, की १३ जुलै रोजी दुपारी उमरग्यात पतंगे रोड येथील मोमीन मशिदीजवळ सौमाया रमेश शिंदे (वय ४५) या महिलेचा मृतदेह तिच्याच घरात बेडवर पडलेला असल्याची माहिती मिळाली. तिच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण स्पष्ट दिसत होते. माहिती मिळताच, पोलिस अधिकारी व अंमलदार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि मोमीन मशिदीजवळील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या चौकशीतून तपास केला. यात, मृत महिला सौमाया शिंदे हिचा प्रियकर माधव पांडुरंग पाचंगे (वय ४४, रा. हिप्परगा रवा, ता. उमरगा, ह.मु. तुरोरी, ता. उमरगा) यानेच तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. अनैतिक संबंधातून चारित्र्यावर संशय घेऊन तसेच मृत महिलेमुळे आपले कौटुंबिक जीवन बरबाद झाल्याचा राग मनात धरून, माधव पाचंगे याने १२ जुलैच्या रात्री तिच्या घरी जाऊन गामजाने (शर्ट किंवा इतर कपड्याने) गळा आवळून तिचा खून केल्याचे समोर आले. मयत महिलेची मुलगी रोहिणी दीपक पाटोळे (वय २४, रा. साईनगर सोसायटी मांजरी, पुणे) हिने फिर्याद दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तपासादरम्यान आरोपी माधव पाचंगेचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेण्यात आला. त्याला पुण्यातून ताब्यात घेऊन १४ जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली. उमरगा येथील न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.