Tuesday, July 22, 2025
Homeइचलकरंजीउपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील भूखंड देण्याचे आदेश आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्यातून प्रश्‍न...

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील भूखंड देण्याचे आदेश आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्यातून प्रश्‍न मार्गी : 61 कोटीचा निधीही मिळणार

इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील गट क्रमांक 468 हा शासकीय भूखंड ताब्यात घेऊन तेथे कार्यालायीन इमारत व आवश्यक सोयी-सुविधांसह केंद्रीय धोरणानुसार ऑटोमेटीक टेस्टींग केंद्र (एटीसी) व ऑटोमेटेड ड्रायव्हींग टेस्ट ट्रॅक या स्वयंचलित यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक 61 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई बैठकीत दिले. आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या निर्णयामुळे आता वाहनधारकांची धावपळ कमी होणार आहे.

इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी भूखंड मिळावा अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली होती. त्यानुसार गुरुवारी मुंबईतील विधान भवन येथे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस आमदार राहुल आवाडे, मुंबईचे परिवहन आयुक्त, कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी एल. ए. दराडे, इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले व संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे व इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील व्हिसीद्वारे सहभागी झाले होते.

प्रारंभी आमदार राहुल आवाडे यांनी, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण वाहनांच्या संख्येपैकी 45 टक्के वाहने हातकणंगले व शिरोळ तालुक्यात आहेत. या वाहनांना पासिंगसाठी शहर व परिसरात ट्रॅक उपलब्ध नसल्याने कोल्हापूर येथील आरटीओ कार्यालय व तेथून मोरेवाडी येथील पासिंग ट्रॅक येथे जावे लागत होते. इचलकरंजीची गरज ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजीसाठी एमएच 51 हा स्वतंत्र नोंदणी क्रमांक व तारदाळ येथील पासिंग ट्रॅकला मंजुरी दिली. आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजीमध्ये झाल्याने वाहनधारक व नागरिकांना सोयीचे झाले. मात्र कार्यालयासाठी स्वतंत्र जागा नसल्याने ते सध्या शहापूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या जागेत सुरु आहे. पूर्वी आठवड्यातून दोन दिवस आरटीओ कॅम्प घेतला जात होता. आता कार्यालय पूर्णवेळ सुरू झाल्याने या जागेचा वापर नियमित कामकाजासाठी केला जात आहे. ही जागा अपुरी पडत असल्याने कार्यालयीन इमारत व आवश्यक सुविधांसाठी स्वतंत्र भूखंड मिळावा अशी मागणी केली. त्याचबरोबर वाहन योग्यता प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती चाचणी ही स्वयंचलित यंत्रणेद्वारे करणे शासनाने अनिवार्य केल्याने आताची जागा अपुरी पडत असून कार्यालयीन इमारत, स्वयंचलितअनुज्ञप्ती चाचणीपथ व वाहन अटकाव क्षेत्रासाठी शहापूरातील गट क्रमांक 468 हा भूखंड कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. उपस्थित अधिकार्‍यांनी त्याला मान्यता दिली. तर जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनीही या संदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे.

त्यानंतर चर्चेअंती परिवहन मंत्री सरनाईक यांनी शहापूरातील गट क्र. 468 हा भूखंड उपलब्ध करून देण्यासह त्याठिकाणी कार्यालयीन इमारत व सुविधांसाठी 30 कोटी रुपये, ऑटोमेटीक टेस्टींग केंद्र (एटीसी) यासाठी 15 कोटी रुपये व अ‍ॅटोमेटेड ड्रायव्हींग टेस्ट ट्रॅक (एडीटीटी) साठी 16 कोटी रुपये असा 61 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करुन देण्याचे संबंधितांना आदेश दिले. त्यामुळे हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांसह नागरिकांची सोय होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -