झुआरी अग्रो केमिकल्स लिमिटेडच्या नावाने बनावट १०.२६.२६ खताच्या पुरवठा करणाऱ्या विरोधात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत भरारी पथकाने कारवाई केली आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे मंगळवारी (दि. १५) मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयास्पद मालवाह वाहन (एमएच १५ एफव्ही ७७१७) बनावट १०.२६.२६ खताच्या २४० बॅगा जप्त करण्यात आल्या. या खताची अंदाजे किंमत ३.३० लाख रुपये असून, वाहनासह एकूण १५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील, कृषी अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण रामा दिघे, पोलिस उपनिरीक्षक मोहित मोरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
जप्त केलेल्या खताचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून, हरसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांचे मार्गदर्शन लाभले.
सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभागघरपोच मिळणारी अनुदानित खते खरेदी करू नयेत. खते खरेदी करताना बॅग सीलबंद आहे आणि त्यावरील माहिती कायद्यानुसार आहे, याची खात्री करावी. तसेच, अधिकृत विक्रेत्यांकडून आणि पक्क्या बिलासह पॉस मशीनव्दारे खरेदी करावी. शेतकऱ्यांनी बनावट खतांपासून सावध राहावे आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा.