आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं. अखेर 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पदरी यश पडलं. पण या यशाच्या आनंदावर विरजण पडलं. त्यानंतर आरसीबीच्या पाठी चौकशीचा ससेमिरा लागला. कारण बंगळुरु झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मैदानात आयोजित केलेला विजयोत्सव थोडक्यात गुंडाळण्याची वेळ आली. त्यानंतर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती डी’कुन्हा आयोग स्थापन केला होता. या आयोगाने दिलेल्या अहवालाची कर्नाटक सरकारने दखल घेतली आहे. बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मान्यता दिली आहे. आयोगाच्या अहवालात या चेंगराचेंगरीप्रकरणी अनियमितता आणि गैरप्रकार उघडकीस आला आहे. त्या आधारे आता पुढची कारवाई केली जाणार आहे. तर बंगळुरूच्या माजी पोलिस आयुक्तांसह पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आधीच निलंबित करण्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, 4 जून रोजी झालेल्या घटनेत विराट कोहलीचं नाव देखील पुढे आलं आहे. विराट कोहलीने एका व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना फुकटात विजयी सोहळ्यात सहभागी होण्याची अपील केली होती. दुसरीकडे, कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या डीएनए नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडने पोलिसांनी 3 जूनला फक्त सूचना दिली होती. पण आवश्यक त्या परवानग्या घेतल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हा कार्यक्रम करण्यास नकार दिला होता. मात्र असं असूनही आरसीबीने सोशल मीडियावर 4 जून रोजी विजयी कार्यक्रमाचा प्रचार केला. चाहत्यांनी या कार्यक्रमासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात तीन लाखाहून अधिक लोकांची गर्दी झाली होती.
रिपोर्टमधील दाव्यानुसार, आरसीबी, डीएनए आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला. गेट उघडण्यास उशीर झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात 7 पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले होते. एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 40 हजारांपेक्षा कमी लोक बसू शकतात. कार्यक्रमादरम्यान3 लाखाच्या आसपास लोकं आले होते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.