मुंबईत ओला, उबर आणि रॅपिडो या सारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवा तीन दिवसांपासून बंद आहेत. यामुळे मुंबईकरांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. चालकांना मिळणाऱ्या कमी कमाईमुळे आणि कंपनीकडून आकारण्यात येणाऱ्या जास्त कमिशनमुळे ओला, उबर आणि रॅपिडो चालकांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा संप सुरुच ठेवण्याचा निर्धार चालकांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि इंडियन गिग वर्कर्स फ्रंट यांच्या नेतृत्वाखाली हा १५ जुलैपासून हा संप पुकारण्यात आला आहे.
संप पुकारण्यामागील नेमकं कारण काय?
ओला, उबर आणि रॅपिडो या सारख्या ॲप-आधारित टॅक्सी चालकांनी १५ जुलैपासून हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून विशेषतः विमानतळ, बीकेसी, अंधेरी आणि दक्षिण मुंबईतील लोकांना याचा फटका बसत आहे.
कमी उत्पन्न : ओला, उबर आणि रॅपिडो या चालकांना सध्या प्रति किलोमीटर फक्त ८ ते १२ रुपये मिळतात. यात त्यांच्या कारचा पेट्रोलचा खर्च, गाडीची देखभाल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अडचणी येतात. यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
जास्त कमिशन : ओला आणि उबरसारख्या कंपन्या चालकांकडून ३० ते ४० टक्क्यांपर्यंत कमिशन आकारतात, हे कमिशन खूप जास्त आहे. त्यामुळे हे कमिशन कमी करून ते १० ते १५ टक्क्यांपर्यंत आणावं. जेणेकरून चालकांच्या कमाईत वाढ होईल.
नियम आणि धोरणांचा अभाव : सरकारने ॲप-आधारित टॅक्सी सेवांसाठी कोणतेही स्पष्ट आणि कडक नियम बनवलेले नाहीत. यामुळे कंपन्या मनमानी कारभार चालवतात. यामुळे चालकांना योग्य दर मिळत नाहीत. तसेच पारंपरिक टॅक्सीप्रमाणे प्रति किलोमीटर १८ रुपये भाडे मिळावं अशी मागणी चालकांनी केली आहे.
महाराष्ट्र एग्रीगेटर धोरणाची अंमलबजावणी: महाराष्ट्र सरकारने २०२० मध्येच एग्रीगेटर धोरण तयार केले आहे, पण त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. या धोरणामुळे चालकांना अधिक सुरक्षा आणि योग्य भाडे मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हे धोरण तात्काळ लागू करण्यात यावे अशी मागणी चालकांनी केली आहे.
गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स वेलफेअर ॲक्ट: चालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स वेलफेअर ॲक्ट लागू करावा, अशी मागणीही चालकांकडून केली जात आहे.
बाईक टॅक्सींवर बंदी: सध्या मुंबईत बाईक टॅक्सी सेवांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे स्पर्धा आणि सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. यामुळे मोठ्या गाड्या चालवणाऱ्या टॅक्सी चालकांच्या कमाईवर परिणाम होत आहे. यामुळे या बाईक टॅक्सींवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी चालकांकडून करण्यात आली आहे.
अद्याप कोणताही ठोस निर्णय नाही
दरम्यान युनियन नेत्यांनी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबद्दल चर्चा केली आहे. परंतु अद्याप कोणतेही ठोस किंवा लेखी आश्वासन मिळालेले नाही. जोपर्यंत चालकांच्या कल्याणासाठी, भाडे निश्चितीसाठी आणि ॲप कंपन्यांच्या जबाबदारीसाठी लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार चालकांनी व्यक्त केला आहे. या संपामुळे मुंबईतील विमानतळ, बांद्रा-कुर्ला संकुल (BKC), अंधेरी आणि दक्षिण मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक प्रवासांना ऑफिसला पोहोचण्यात उशीर होत आहे. तर काहीजण जास्त पैसे खर्च करुन इतर पर्याय शोधावे लागत आहेत.