गुरुवारी विधानसभेच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला, भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक एकमेकांना भिडले, प्रकरण शिविगाळ आणि मारहाणीपर्यंत पोहोचलं. हा राडा चक्क विधानभवनाच्या लॉबीमध्ये झाल्यानं आता या प्रकरणाची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून घेण्यात आली आहे. या राड्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आमदारांना चांगलंच सुनावलं आहे, तसेच मोठा निर्णय घेतला आहे.
राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?
या अप्रिय घटनेनंतर मी सर्व आमदारांना सांगत आहे, विधीमंडळाची परंपरा जपण्याचे उत्तरदायित्त्व हे आमदारांचे आहे. आमदारांचे वर्तन हे विधीमंडळाची प्रतिमा उंचावणारे असावे अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच काही नियम पाळणे गरजेचे आहे. म्हणूनच लोकसभेच्या धर्तीवर नितीमूल्य समिती गठीत केली जाईल, याबाबतचा निर्णय एका आठवड्यात घेतला जाईल, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यापुढे आता विधानभवनात अभ्यांगतांना प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांत आमदारांचे वर्तन हे चिंतेची बाब आहे, आमदारकीची शपथ घेताना आपण संविधानाबाबत दे बोलतो ते गांभीर्याने पालन करण्याची गरज आहे. म्हणून यापुढे फक्त आमदार व त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यकांनाच विधानभवनात प्रवेश दिला जाईल, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
तसेच बहुतेक वेळा मंत्री विधीमंडळात बैठक घेतात, पण आता मंत्र्यांनीही त्यांच्या बैठका मंत्रालयात घेण्याच्या सूचना देत आहे. अपवादात्मक परिस्थितीत बैठक घेतली तर अभ्यांगतांना प्रवेश दिला जाणार नाही, असंही यावेळी नार्वेकर म्हणाले आहेत.
दरम्यान यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी सभागृहात एकटाच येतो, मी कुणाच्या पासवर सही करत नाही, चुकीचे रेकॉर्ड वर येऊ नये. मी घटना घडली तेव्हा सभागृहात नव्हतो. माझा घटनेशी कुठलाही संबंध नाही. मी कुणाला खुनावले ही नाही. या लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही जीवंत आहे. मी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे. मला धमक्या येत होत्या हे मी काल सांगितले, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे