वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स 2025 या स्पर्धेला 18 जुलैपासून सुरुवात झालीय. या स्पर्धेत 18 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान एकूण 6 संघांमध्ये 18 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे 20 जुलैला इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स या सामन्याकडे लागून आहे. इंडिया चॅम्पियन्स टीम पाकिस्तान चॅम्पियन्स विरूद्धच्या सामन्यातून या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. मात्र या सामन्याआधी सोशल मीडियावर संताप पाहायला मिळत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतरही भारताचे खेळाडू पाकिस्तानसोबत मॅच का खेळत आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरुन गौतम गंभीर याचे बालपणीचे कोच संजय भारद्वाज यांनी भारतीय खेळाडूंना चांगलंच सुनावलं आहे. कुणीतरी खेळाडूंना जाऊन तु्म्ही असं का करताय? असं विचारायला हवं, असं भारद्वाज यांचं म्हणणं आहे. तसेच “यांना पैसा पाहिजे”, असा आरोपही भारद्वाज यांनी भारतीय खेळाडूंवर केला. तसेच पाकिस्तान विरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूंना घेरायला हवं, असंही भारद्वाज यांनी चाहत्यांना म्हटलं आहे.
संजय भारद्वाज काय म्हणाले?
“ही बीसीसीआयची टीम नाही, ही आयसीसीची स्पर्धाही किंवा मालिकाही नाही. हा खेळाडूंचा एक गट आहे जो तिथे जाऊन खेळत आहे. ही अधिकृत स्पर्धा नाही. हा जुन्या खेळाडूंचा गट आहे. त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना पैसे हवे आहेत. यांना कोणासोबतही खेळवा, यांना फक्त पैसे हवे आहेत”, अशा शब्दात भारद्वाज यांनी इंडिया चॅम्पियन्सच्या खेळाडूंना सुनावलं. ते एका हिंदी वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.
“यांनी हा मुर्खपणा केलाच का?”
“हे परत आल्यावर यांना विचारा की यांनी का केलं? यांनी हा मूर्खपणा का केलाय”,असं भारद्वाज यांनी म्हटलं. “हे फक्त पैशांसाठी असं करत आहे”, असंही भारद्वाज यांनी म्हटलं.
चाहत्यांना आवाहन
“या खेळाडूंच्या चाहत्यांनी त्यांना टोकायला हवं की तुम्ही हे सर्व का करताय”, असं आवाहन भारद्वाज यांनी या क्रिकेटपटूंच्या चाहत्यांना केलं.
” तसेच हे खेळण्यासाठी नाही तर पैशांसाठी गेले आहेत” असा गंभीर आरोपही भारद्वाज यांनी इंडिया चॅम्पियन्स टीममधील खेळाडूंवर केला आहे.
सामना कधी आणि कुठे?
दरम्यान इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना हा 20 जुलै रोजी होणार आहे. हा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत युवराज सिंह इंडिया चॅम्पियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याबाबत गरळ ओकणारा शाहिदी आफ्रिदी याच्याकडे पाकिस्तान चॅम्पियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.