प्रेमविवाह केल्याच्या कारणातून चंदूर येथील वैभव अनिल पुजारी (वय २३) याच्यावरील सशस्त्र हल्ला प्रकरणातील ओंकार बिरु पुजारी (रा. तिळवणी) आणि राहल श्रीकांत कांबळे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने कोल्हापूरातील तावडे हॉटेल परिसरातून
अटक केली आहे. हे दोघेही कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होते. तर मयुर आकाराम पुजारी (रा. चंदूर), शुभम बोरसे (रा.उदगांव), बंडा शिंदे (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) यांचा शोध सुरु आहे.
चंदूर येथील वैभव पुजारी हा एका पोलिसाच्या मालकीच्या असलेल्या जनावरांच्या गोठ्यात मजूर म्हणून काम करतो. महिन्याभरापूर्वी त्याने गावातीलच एका मुलीशी प्रेमविवाह केला आहे. त्याला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. या रागातून वैभव पुजारीवर हल्ला झाला होता. हल्ला प्रकरणी वैभवने ओंकार पुजारी, राहुल कांबळे, मयुर पुजारी, शुभम बोरसे व बंडा शिंदे या पाचजणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली होती. तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरु केला होता. त्यावेळी पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना प्राप्त माहितीनुसार कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ओंकार पुजारी व राहुल कांबळे यांना तावडे हॉटेल परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले.