प्रवाशांच्या सोयी-सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने गेल्या काही दिवसात नियमातील बदलाचा धडाका लावला आहे. त्याचा नियमीत प्रवाशांना मोठा फायदा होत आहे. रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. रेल्वे तिकीट रिझर्व्हेशनसह वेटिंग तिकीट, रिझर्व्हेशन चार्ज, तत्काळ तिकीटच्या बुकिंगमध्ये रेल्वे विभागाने अनेक बदल केले आहेत. आता रेल्वेने एक स्पेशल टूर पॅकेज आणले आहे. हे पॅकेज घेतल्यानंतर प्रवाशांना तिकीटाचे पैसे हप्त्याने चुकवता येतील. त्यांना EMI द्वारे ही रक्कम भरता येईल.
IRCTC केवळ रेल्वेचे तिकीट बुक करत नाही. तर देश-विदेशासाठी विविध टूर पॅकेज पण देते. रेल्वेकडून देशातील प्रसिद्ध तिर्थस्थळांसाठी स्पेशल टूर पॅकेज देण्यात येते. भारत गौरव यात्रा (Bharat Gaurva Yatra) नावाने हे पॅकेज असते. या योजनेतंर्गत प्रवास करण्यासाठी तुम्हाला फार चिंता करण्याची गरज नसते. तुम्ही ट्रेनचे टूर पॅकेज सहज बुक करू शकता आणि प्रवास झाल्यानंतर हप्त्याने तिकीटाचे पैसे चुकते करू शकता.
EMI सर्व रेल्वेगाड्यांसाठी नाही
आयआरसीटीसी, भारत गौरव ट्रेनसाठीच ही ऑफर देते. हे ट्रेन तिकीट बुकींग करताना प्रवाशांना ईएमआयचा पर्याय मिळतो. समजा तुम्ही 13 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंतच्या भारत गौरव ट्रेनचे तिकीट बुक केले. या ट्रेनच्या इकोनॉमी क्लासचे भाडे हे 18460 रुपये प्रति व्यक्ती आहे. त्यामध्ये स्लीपर क्लासचे ट्रेन तिकीट, हॉटेलमध्ये थांबण्याचा खर्चाचा समावेश आहे. तर थर्ड एसी कोचचे भाडे 30480 रुपये प्रति व्यक्ती आहे. तर कम्फर्ट श्रेणीचे भाडे 40300 रुपये आहे. कुटुंबासोबत प्रवास करायचा असेल तर मग तिकीटाची रक्कम वाढते, त्यामुळे रेल्वेने प्रवाशांसाठी EMI ची सुविधा दिली आहे.
भारत गौरव ट्रेनेचे भाडे चुकते करण्यासाठी प्रवाशांना LTC आणि EMI ची सुविधा मिळते. त्यासाठी IRCTC ने अनेक सरकारी आणि खासगी बँकांशी करार केला आहे. तुम्ही या संकेतस्थळावरून तिकीट बुकिंग करताना ईएमआयचा पर्याय निवडू शकता. हे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर देण्यात येईल.