जगातील बऱ्याच देशांमध्ये अजूनही प्रेमविवाह स्वीकारला जात नाही. आजही अनेक ठिकाणी प्रेमविवाह करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाते. अशातच आता पाकिस्तानातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबाच्या संमतीशिवाय लग्न केल्याने एका तरुण जोडप्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ही घटना घडली आहे. या जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुटुंबाच्या संमतीशिवाय प्रेमविवाह केल्याने जोडप्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची आणि ऑनर किलिंगची क्रूर प्रथा बंद करण्याची मागणी केली जात आहे.
एपीने वृत्तसंस्थेने व्हायरल व्हिडिओ खरा असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये, एक पुरूष एका मुलीवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडताना दिसत आहे, त्याचवेळी इतर लोक बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत बानो बीबी आणि अहसान उल्लाह या जोडप्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत बोलताना बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगटी म्हणाले की, ही घटना देघारी जिल्ह्यात घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये हत्येपूर्वी तरुणी, माझं लग्न कायदेशीर आहे असं म्हणतं आहे. मात्र तरीही या तरुणीला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. तिच्या हत्येनंतर तिच्या पतीचीही हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
एपीच्या वृत्तानुसार आदिवासी समाजाचा सरदार सातकझाईने लव्ह मॅरेज केलेल्या या जोडप्याच्या हत्येचे आदेश दिले होते. या सरदाराकडे वधूच्या भावाने कुंटुंबाशिवाय लग्न केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर या जोडप्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे प्रेमविवाह करणे खरंच गुन्हा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे .