सध्या नालासोपारा येथील टाईल्स मर्डर देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या हत्या प्रकरणात पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. तसेच पतीची हत्या करून पत्नीने त्याला घरताच पुरून त्यावर टाईल्स लावल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार होते. मात्र फक्त एका ओढणीमुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी कसे कचाट्यात सापडले?
हे हत्या प्रकरण समोर आल्यानंतर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक आरोपी वेगवेगळ्या पथकांकडून या प्रकरणाचा तपास केला जात होता. चमन चौहान (वय 25) आणि मोनू शर्मा ( वय 20) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पुण्यातील हडपसर परिसरातून बेड्या ठोकण्यात आले आहे. या परिसरात आरोपी महिलेच्या तोंडावर ओढणी झाकलेली होती. मात्र ऐनवेळी हावेचा झोक आला अन् ती ओढणी उडाली. त्याच क्षणाला आरोपी महिला पोलिसांना दिसली आणि ओळख पटताच प्रियकरासह आरोपी महिलेला 24 तासांत बेड्या ठोकण्यात आल्या. आज दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही 30 जुलैपर्यंत एकूण सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या
दोन्ही आरोपी नालासोपारा पूर्व धणीवबाग, गांगडी पाडा, ओम साई शारदा वेल्फेअर सोसायटीमधील रहिवाशी आहेत. तर विजय चौहान असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. मोनू आणि चमन हे आजूबाजूलाच राहत असल्याने यांच्या मागच्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांमधील प्रेमसंबंध घरच्यांना काळाल्याने यांच्यात वाद सुरू होते. प्रेमात पती अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह घरात पुरून ठेवला होता. 15 दिवसांपासून पतीचा संपर्क होत नसल्याने त्याच्या नातेवाईनकांची फोन वरून विचारपूस होत असल्याने आपले फोन बंद करून आरोपी लोकलने पुण्याला फरार झाले होते.
एका मेडिकलजवळ 5 वर्षांचा मुलाला हातात धरून…
पोलिसांना या हत्येची माहिती मिळाल्या नंतर पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ वेगवेगळ्या टीम बनवून सर्व तांत्रिक बाबींचा तपास करत पुण्याला पोहचले होते. काल मंगळवारी हडपसर परिसरात आरोपींचे लोकेशन मिळाल्यानंतर एका मेडिकलजवळ 5 वर्षांचा मुलाला हातात धरून आरोपी पत्नी प्रियकरासोबत चालली होती. तिच्या तोंडावर ओढणी होती. मात्र अचानक हवा आली आणि तिची ओळख पटली.