तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने सावध पण चांगली सुरुवात केली.यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. केएल राहुल बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वालने मोर्चा सांभाळला. त्याने 96 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात ऐतिहासिक नोंद केली आहे. मागच्या 50 वर्षात भारतीय ओपनरला या मैदानात अशी कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालचा खेळ 58 धावांवर संपुष्टात आला. त्याने 107 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने 58 धावाा केल्या. या खेळीमुळे भारतीय संघाला एक चांगली सुरुवात मिळाली. मागच्या 51 वर्षात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारतीय ओपनरने 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या नव्हत्या. यशस्वी जयस्वालपूर्वी सुनील गावस्कर यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी 1974 मध्ये हा कारनामा केला होता.
यशस्वी जयस्वालने या खेळीसह इंग्लंडविरुद्ध कसोटीत 1000 धावाही पूर्ण केल्या आहे. यात इंग्लंडविरुद्ध एक शतक आणि दोन द्विशतकांचा समावेश आहे. तसेच पाच अर्धशतकही ठोकली आहेत. त्याने 66.86 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत त्याने 2089 धावा केल्या. त्यापैकी निम्म्या धावा या इंग्लंडविरुद्ध आहेत. इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा भारताचा 20वा खेळाडू आहे. मोहम्मद अझरुद्दीनसह 16 डावात 1000 धावा करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर राहुल द्रविड असून त्याने 15 डावात ही कामगिरी केली आहे.
दरम्यान, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलची विकेट पडल्यानंतर कर्णधार शुबमन गिलकडे लक्ष होतं. मात्र त्याला या सामन्यात काही खास करता आलं नाही. त्याचा डाव अवघ्या 12 धावांवर संपुष्टात आला. त्याने 23 चेंडूत 1 चौकार मारत 12 धावा केल्या. तसेच बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. भारताला हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. तसं झालं नाही तर किमान ड्रॉ करून मालिकेचं गणित पाचव्या कसोटीवर न्यावं लागेल. कारण आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे.