देशातील गरीब जनतेला २ वेळच खायला मिळावं यासाठी केंद्र सरकार कडून मोफत रेशन वाटप करण्यात येत. देशातील जवळपास ८० कोटी जनता रेशनचा लाभ घेते. यामाध्यमातून लोकांना गहू, तांदूळ सह इतर काही वस्तू मिळतात. मात्र आता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जे रेशन कार्ड धारक सलग सहा महिने रेशनवरील धान्याचा लाभ घेत नाहीत त्यांचा लाभ सरकारकडून बंद केला जात आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून प्रत्येक सहा महिन्यांनी यादी पाठवली जात आहे. त्यामुळे जर तुम्हीही मागील ६ महिन्यापासून रेशन घेतलं नसेल तर तुमचंही रेशन इथून पुढे बंद होऊ शकते.
७% ते १८% कार्ड रद्द होऊ शकतात – Ration Card
केंद्र सरकारने २२ जुलै रोजी लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश, २०२५ अधिसूचित केला आहे. या अंतर्गत, ज्या रेशन कार्ड धारकांनी मागील ६ महिन्यांपासून रेशन घेतले नाही त्यांचे कार्ड (Ration Card) सक्रिय राहणार नाहीत. त्यानंतर ३ महिन्यांत, घरोघरी पडताळणी आणि ई-केवायसीद्वारे पुन्हा पात्रता निश्चित केली जाईल. सरकारच्या या निर्णयानंतर किती कार्ड रद्द केले जातील हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. मात्र महाराष्ट्रात अंदाजे ७% ते १८% कार्ड रद्द होऊ शकतात असं बोललं जात आहे. अपात्र लोकांना या रेशन कार्ड यादीतून वगळणे हाच या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. ज्या लोकांना रेशन वरील धान्याची गरज नाही अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा लाभ बंद करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
उदाहरणार्थ, सोलापूर जिल्ह्यातील ५००० पक्ष जास्त रेशन कार्ड R(ation Card) धारकांचा रेशनवरील धान्याचा लाभ गेल्या काही महिन्यांच्या काळात बंद करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.त्यानंतर हि रेशनकार्ड सायलेंट समजून त्यांचं धान्य बंद करण्यात आलं आहे. सलग ६ महिने ज्यांनी रेशन घेतलं नाही त्यांना या धान्याची गरज नाही असं समजून हे धान्य बंद केलं जाणार आहे.
दरम्यान, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, रेशनकार्डची पात्रता यादी दर 5 वर्षांनी तपासली जाईल. कार्डमध्ये नोंदणीकृत 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार क्रमांक वापरला जाईल. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केवायसी अनिवार्य असेल. ज्यांच्या नावावर २ -२ रेशन कार्ड आहेत त्यांचे कार्ड ३ महिन्यांसाठी निलंबित केले जातील.