यंत्रमाग कारखान्यात साफसफाई करत असताना मशिनमध्ये अडकल्याने महिलेचा कोपऱ्यापासून हात तुटल्याची दुर्घटना आभार फाटा चंदूर परिसरात पडली. सौ. सुशिला विजय पाटील (वय ५० रा. चंदूर) असे महिलेचे नांव आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चंदुर येथे राहण्यास असलेल्या विजय पाटील यांचा आभारफाटा परिसरात भाड्याच्या शेडमध्ये यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्यात विजय आणि त्यांची पत्नी सुशिला हे दोघे स्वतःच काम करतात. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरकाम आटोपल्यानंतर सुशिला पाटील या कारखान्यात आल्या व त्यांनी साफसफाई सुरु केली. काम करत असतानाच अचानकपणे सुशिला यांचा हात मशिनमध्ये अडकला. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा सुरु केला. त्यांचा आवाज ऐकुन विजय पाटील धावत आले आणि त्यांनी कारखान्यातील बीज पुरवठा बंद केला. मात्र सुशिला यांचा हात मशिनमध्ये अडकून तो कोपन्यापासून तुटला होता. त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.