बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात आत्याचा नवरा म्हणजेच मामासोबतच्या अनैतिक संबंधातून पतीची गोळी घालून हत्या केल्याचं प्रकरण मागील काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय होता. आता या प्रकरणासंदर्भात मोठा सुगावा पोलिसांच्या हाती लागला आहे.
आत्याच्या नवऱ्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे पत्नीने पतीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच संबंधित महिलेच्या मामाला घटनास्थळापासून सुमारे 1100 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडण्यात आलं.
वाटेतच झाडली गोळी अन्…
आरोपी बनावट ओळखपत्र दाखवून सवाई माधोपूरमधील रणथंबोर रोडवरील एका हॉटेलमध्ये राहत होता. बिहार पोलिसांच्या माहितीवरून स्थानिक मॅनटाउन पोलिस स्टेशनने या प्रकरणातील ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, 24 जून 2025 रोजी प्रियांशू सिंग उर्फ छोटू नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. पीडित तरुण नवीनगर रोड स्टेशनवरून त्याच्या गावी बारवानला परतत असताना वाटेत आरोपींनी त्याच्यावर गोळी झाडली.
आत्याच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध
21 मे रोजी प्रियांशूचं लग्न टंडवा पोलीस स्टेशन हद्दीतील घुरासागरची रहिवासी असलेल्या गुंजा सिंगसोबत झालं होतं. लग्नाच्या अवघ्या एका महिन्यानंतर ही धक्कादायक घटना घडली. पोलिस तपासादरम्यान गुंजा सिंगचे तिच्या आत्याच्या नवऱ्यासोबत म्हणजेच मामा जीवन सिंगसोबत अवैध संबंध असल्याचं स्पष्ट झालं. जीवन सिंगला गुंजाने लग्न करावं, असं वाटत नव्हतं. यामुळे त्याने अनेकदा गुंजाचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता. प्रियांशूशी लग्न केल्यानंतरही गुंजा तिच्या सासरच्या घरात पतीपासून अंतर ठेवत होती.
मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक
प्रियांशूला मारुन टाकण्यासाठी त्याची पत्नी गुंजा आणि आरोपी मामा जीवन यांनी दोन शूटरची मदत घेतली आणि त्याला ठार मारुन टाकलं. हत्येच्या काही दिवसांतच पोलिसांनी शूटर आणि गुंजा सिंगला अटक केली. पोलिस चौकशीत गुंजाने तिचा गुन्हा कबूल केला होता. परंतु प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच गुंगाचा मामा जीवन सिंग फरार होता. मात्र, पोलिसांनी आता जीवना सिंगला एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं आहे.