मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. तब्बल १४ हजारांहून जास्त पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलंय.
आता या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. अपात्र लाभार्थींची छाननी सुरू ठेवा, ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यांची चौकशी करा असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलं.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माहितीनुसार, २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेतल्याने त्यांचा लाभ थांबविण्यात आला होता. यामध्ये काही पुरुषांनीही लाभघेतल्याची गंभीर बाब समोर आली होती. या पुरुष लाभाध्यर्थ्यांची चौकशी करा, त्यांच्या घरी विकलांग किंवा अन्य कारणांनी महिलांचे खाते नसेल आणि महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले का हेही तपासा. ज्या प्रकरणांत पुरुष दोषी असतील तर त्यांच्याकडून वसुली करा, असे निर्देश देण्यात आले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानादेखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. या माहितीच्या आधारे जून २०२५ पासून या २६ लाख ३४ हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.
पात्र असलेल्या सुमारे दोन कोटी २५ लाख पात्र ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा हप्ता वितरित केला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६.३४ लाख लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत माहिती घेण्यात आली.
अपात्र महिलांचा लाभ बंद करा !
सरकारी नोकरदार, विविध योजनांच्या लाभार्थी आणि अन्य निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभबंद करण्यात यावा. तसेच त्यांची सातत्याने पडताळणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.