२०२५ हे वर्ष सुरू होऊन सात महिने उलटले आहेत आणि या काळात भारताने अनेक विनाशकारी दुर्घटना अनुभवल्या आहेत. मोठी जीवितहानी, भीषण दहशतवादी हल्ला, हृदयद्रावक विमान अपघात आणि मंदिरात झालेली भयावह चेंगराचेंगरी अशा एकामागून एक संकटांना देश सामोरा गेला आहे.
आता वर्ष संपायला पाच महिने शिल्लक असताना, एका ज्योतिषाने आणखी काही मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. ही रील पोस्ट झाल्यापासून आतापर्यंत तिला 1.3 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
‘सुपरटॉक्स’ नावाच्या एका पॉडकास्टवर, प्रसिद्ध ‘पास्ट-लाइफ एक्सपर्ट’ (पूर्वजन्म तज्ज्ञ) संजीव मलिक यांनी २०२५ च्या अखेरपर्यंत भारताच्या भविष्याविषयी आपली निरीक्षणे मांडली आहेत. अँकर सोबत संवाद साधताना त्यांनी भाकीत केले की, देशाला आणखी एका मंदिरात चेंगराचेंगरीच्या घटनेला सामोरे जावे लागू शकते. ‘नोव्हेंबर महिन्यात कोणत्यातरी मंदिरात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता दिसत आहे,’ असे ते म्हणाले.
संजीव मलिक यांच्या म्हणण्यानुसार, ते अचूक ठिकाण सांगू शकत नसले तरी, ही घटना उत्तर भारतात, शक्यतो मथुरेत घडू शकते. पुढे त्यांनी या वर्षीच्या मान्सूनविषयीही भाष्य केले. ‘या वेळचा पाऊस सर्वांना रडवेल,’ असे भाकीत त्यांनी वर्तवले.
‘डोंगराळ भागांमध्ये, विशेषतः गंभीर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो,’ असे संजीव मलिक यांनी नमूद केले. उत्तराखंडमधील अलीकडील घटनेचा संदर्भ देत, जिथे ऋषिकेशहून गंगोत्रीला जाणाऱ्या कावड यात्रेकरूंची बस उलटली होती, मलिक यांनी लोकांना २०२५ च्या उत्तरार्धात, विशेषतः पर्वतीय प्रदेशात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
ऑक्टोबरमध्ये रेल्वे अपघाताची शक्यता
इतकेच नाही, तर ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास भारतात आणखी एक मोठी जीवितहानी करणारा रेल्वे अपघात होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणांनुसार, हा अपघात आंध्र प्रदेश, कर्नाटक किंवा तामिळनाडूमध्ये होण्याची शक्यता आहे. आपल्या भाकितांचा समारोप करताना त्यांनी सांगितले की, भारताला गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या शेअर बाजार घसरणीचा सामना करावा लागू शकतो. ‘२०२५ च्या अखेरीस, डिसेंबर महिन्यात शेअर बाजारात अत्यंत गंभीर स्वरूपाची घसरण अपेक्षित आहे,’ असे त्यांनी नमूद केले. त्यांनी आर्थिक क्षेत्रातील लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.
ही रील व्हायरल होताच अनेकांनी कमेंट विभागात प्रतिक्रिया दिल्या. २७ जुलै रोजी हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची आठवण अनेकांनी करून दिली. एका नेटक-याने लिहिले, ‘हे खरं आहे.. आज मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली.’ तर दुसऱ्या एका युजरने, अशा घटना टाळण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणाला, ‘तुमच्या आध्यात्मिक ज्ञानाबद्दल पूर्ण आदर आहे, परंतु जर तुम्हाला खरोखरच भारतातील अशा दुःखद घटनांची पूर्वकल्पना येत असेल, तर केवळ विनाशकारी भाकीत करण्याऐवजी, तुम्ही तुमच्या दैवी शक्तीचा वापर करून अधिक स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य तपशील मिळवून ती आपत्ती टाळण्यास मदत का करत नाही?’ असा सवाल उपस्थित केला आहे.