रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच भिवंडी-वाडा (Thane) महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्याने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घराजवळच असलेल्या खड्ड्यांमुळे 18 वर्षीय यश मोरे याचा अपघात झाला आणि दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याने प्राण सोडला. रक्षाबंधनाचा (Rakshabandhan) सण हृदयस्पर्शी प्रेमाचे प्रतिक मानला जातो, पण यशची बहीण मात्र अश्रूंच्या ओघात प्रशासनाला एकच सवाल विचारत होती. “आता कोणाला राखी बांधू?” ही हृदयद्रावक घटना पहाटेच्या वेळी घडली. यश मोरे आपल्या मित्रासोबत नेहमीप्रमाणे व्यायामासाठी घराबाहेर पडला होता. घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर भिवंडी-वाडा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात त्याची दुचाकी आदळली. त्यात दोघेजण गंभीर जखमी (Accident) झाले, यशला तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, 10 दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर यशचा दुर्दैवी अंत झाला.
राजेश मोरे यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुल आणि छोटं कुटुंब होतं. मात्र या खड्ड्यामुळे बहिणीने आपला भावाला गमावलं आणि या कुटुंबीयांसाठी रक्षाबंधनचा सण आता कायमचा थांबला आहे. यशच्या बहिणीचा आक्रोश आता संपूर्ण समाजाचा आवाज बनू पाहतोय. ती म्हणते, “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच का प्रशासन जागं होतं? रस्ते वेळेवर दुरुस्त करता येत नाहीत का?” “या खड्ड्यांनी आणखी किती घरं उद्ध्वस्त झाल्यावर प्रशासन पावलं उचलणार?” असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक आणि यशचे नातेवाईक विचारत आहेत. स्थानिकांनी आणि मोरे कुटुंबीयांनी खड्डे तात्काळ बुजवावेत, रस्त्यांची देखभाल नियमित करावी आणि यशसारखा बळी पुन्हा कुणाचा जाऊ नये यासाठी मागणी केली आहे.
नागरिकांचा संतप्त रास्ता रोको
खड्ड्यांमुळे मागील कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेल्या भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्याने यंदाच्या पावसाळ्यातला पहिला बळी घेतला आहे. यश राजेश मोरे (वय 18 ) रा. मडक्याचा पाडा, कवाड असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या मृत्युच्या बातमीनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. बुधवारी सायंकाळी यशा मृतदेह घरी आणला असता संतप्त नागरिकांनी मृतदेह असलेली रुग्णवाहिका रस्त्यावर आडवी उभी करून संतप्त रास्ता रोको आंदोलन करीत खड्ड्यांना जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्या
अधिकारी अन् ठेकेदारांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी मडक्याचा पाडा येथे राहणारा युवक यश मोरे (वय 18) वर्षे व त्याचा मित्र यश घुटे (वय 18) रा. विश्वभाती फाटा असे दोघे सकाळी लवकर व्यायाम करण्यासाठी कवाड येथील व्यायामशाळेत जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळून दोघेजण खाली पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले होते. दोघांना ठाणे येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर यश मोरे याची प्राणज्योत बुधवारी मावळली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. नागरिकांनी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी रास्तारोको आंदोलन सुरू केल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल 2 तास ठप्प झाली होती. ज्याचा फटका घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला आहे. या आंदोलनानंतर पोलिस उपअधीक्षक राहुल झालटे,तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे ,स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश मनोरे हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होत नागरिकांची समजूत काढत योग्य तो गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृत यशचे वडील राजेश मोरे यांचा पुरवणी जबाब घेऊन त्यामध्ये रस्त्याचे ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची नावे गुन्ह्यांमध्ये समाविष्ट केल्यानंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह घरी नेला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत करण्यास सुरुवात केली.