नांदणी मठाच्या हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू, त्यासाठी वनताराही सकारात्मक आहे असं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं. तर मठाची हत्तीण वनतारामध्ये नेण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही, जे काही झालं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाल्याचं वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केलं.
नांदणी मठाची हत्तीण परत आणण्यासाठी कोल्हापुरात मोहीम सुरू झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठी अपडेट समोर येत आहे. शुक्रवारी वनताराचे सीईओ, नांदणी मठाचे मठाधीपती आणि कोल्हापुरातील नेते यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.
बैठकीत काय ठरलं?
कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वनतारामध्ये नेण्यात आली. त्यामुळे कोल्हापूरवासियांमध्ये एक असंतोष निर्माण झाल्याचं दिसून आलं. याच मुद्द्यावर वनताराचे सीईओ आणि मठाधीपती यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली.
वनताराची यामध्ये कोणतीही भूमिका नाही
या सर्व घडामोडींमध्ये वनताराची कोणतीही भूमिका नसल्याचं सीईओंनी स्पष्ट केलं. वनताराने जे काही केलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केलं. त्यामुळे जर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आले तर वनताराकडून माधुरी हत्तीण परत देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं.
कोर्टाच्या सूचना आल्या तर हत्तीण परत करू
नांदणी मठाने त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात आणि वनतारा त्यासाठी सर्व ते सहकार्य करेल असं वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केलं. हवं असेल तर नांदणीच्या मठामध्ये वनताराचे एक युनिट सुरू करू. आम्हाला जर कोर्टाच्या सूचना आल्या तर आम्ही त्यापद्धतीने कार्यवाही करू. आमची यामध्य भूमिका शून्य आहे. लोकांमध्ये तीव्र आक्षेप आहे, पण आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असं वनताराच्या सीईओंनी म्हटल्याचं प्रकाश आबिटकरांनी माहिती दिली.
कायदेशीर प्रक्रिया सुरू करू
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, “कोल्हापूरवासियांची भावना सर्वोच्च न्यायालयात मांडू. एखादा निर्णय ज्या वेळी सर्वोच्च न्यायालय घेते त्यावेळी फक्त जनभावना महत्त्वाची नाही. त्या जनभावनेइतकीच कायदेशीर प्रक्रियाही महत्त्वाची आहे. त्यामुळे एका बाजूला आपण कायदेशीर लढाई लढू. यासाठी वनताराचे सहकार्य राहील.”
जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हत्तीणीविषयी असलेल्या भावनेला राजकारणाचे रुप येऊ नये, त्याचं राजकारण कुणीही करू नये असं आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केलं.