सोलापूर जिल्ह्यातील लऊळ गावापासून तीन किलोमीटर दूर एका वस्तीवर बालाजीचे घर आहे.”78 लाखांची जमीन विकली, ट्रॅक्टरवर दोन लाख रुपये कर्ज काढलंय. पाच तोळं सोनं सोनाराकडे गहाण ठेवलंय.
लोकांकडून पाच-सहा लाख रुपये उसनं पैसं घेतलेत. त्या हिशोबानं एक कोटी अन् नऊ लाख रुपये गेलं. अकाउंट झिरो झालं, तेव्हाच मी थांबलो. पैसेच नव्हते तेव्हाच मी थांबलो.”
26 वर्षांच्या बालाजी खारेने जेव्हा हे सांगितलं, त्यानंतर तो काही क्षण स्तब्ध राहिला. काहीच बोलला नाही.
एका बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग म्हणजे ऑनलाईन जुगारात त्याच्याकडून एक कोटींहून अधिक रुपयांचा चुराडा झाला आहे.
बालाजी पुढे सांगू लागला, “मी फक्त ऑनलाईन चक्री गेमच खेळायचो. त्यात सोळा – सतरा गेम हायत्या. पण चक्रीच खेळायचो. फनरेट चक्री. मी यात एकटाच नाही. यात हजारो तरुण आहेत. कुणालासुद्धा पैसे आलेले नाहीत.”
सोलापूर जिल्ह्यातील लऊळ गावापासून तीन किलोमीटर दूर एका वस्तीवर त्याचं घर आहे.
यामध्ये खारे कुटुंबाची सहा एकर जमीन, पाच तोळे सोने, एक ट्रॅक्टर, 22 जर्सी गाई एवढी मालमत्ता धुळीस मिळाली आहे.
साधी सुपारी पण न खाणाऱ्या बालाजीला या गेमचं व्यसन कसं काय लागलं, यावरून त्याच्या घरचे आश्चर्य व्यक्त करत होते.
ऑनलाईन जुगाराची सुप्त साथ
बालाजी एक ऑनलाईन बेटिंग एक गेम खेळायचा. या गेमचे ॲप स्मार्टफोनमधील प्लेस्टोअरमध्ये मिळत नाही. या अप्लिकेशनची लिंक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवली जाते.
त्यासाठी सोलापूरमधील गावोगावी एजंटचा सुळसुळाट वाढला आहे. हे एजंट्स गावच्या कट्ट्यावर बसणाऱ्या तरुणांना हेरतात. त्यांना या गेमचे अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहन देतात. सुरुवातीला या गेममध्ये पैसेही मिळाल्याचं बालाजीने सांगितलं.
BBCबेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग गेम ॲप
पण नंतर, यातून काहीच पैसे जिंकता येत नाहीत. आधी गेलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती लाखो रुपयांचा चुराडा करत आहे.
सध्या फक्त महाराष्ट्रच नाही, तर भारतातल्या हजारो तरुणांमध्ये ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगची एक सुप्त साथ पसरलीय.
याची सुरुवात टाईमपास किंवा झटपट पैसा कमावण्याच्या अमिषाने होते. पण त्याचे तरुण पिढीवर दूरगामी परिणाम होतायत.
BBCसध्या फक्त महाराष्ट्रच नाही, तर भारतातल्या हजारो तरुणांमध्ये ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगची एक सुप्त साथ पसरलीय.
बालाजीने दिलेल्या माहितीनुसार, लऊळ गावात या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग ॲपचा प्रसार करण्यासाठी एजंट नियमित भेट द्यायचे.
काही मित्र यामध्ये पैसे लावत असल्याचं त्याने पाहिलं. सुरुवातीला काहीजणांना पैसे मिळत असल्याचं दिसल्यावर बालाजीने दोन हजार रुपये भरून याची सुरुवात केली. पण शेवटी हाती काहीच लागलं नाही.
त्यानंतर धाडस करून त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.
संबंधित ॲप हे बेकायदेशीर असल्याने सोलापूर पोलिसांनी कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
अशा फसवणुकीचा प्रकार फक्त बालाजीसोबत घडला नाहीये, भारतात असे हजारो बालाजी ऑनलाईन बेटिंगला बळी पडले आहेत. यात काहीजणांनी स्वत:चा जीवही घेतला असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.
नुकत्याच संपलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती समोर आणली आहे.
त्या, “सध्या तरुणांना नोकऱ्या नाहीयेत. त्यामुळे सहज पैसा मिळवण्यासाठी ऑनलाईन गेमिंगच्या मागे लागलेले आहेत. ऑनलाईन गेमिंग हा जुगाराचा प्रकार आहे आणि कोणत्याही जुगाराला गेम ऑफ स्किल प्रूव्ह करून लिगल करता येतं.
“त्यातून सरकारला GST मिळतो आणि मोठा शेअर कंपनीला जातो. या कंपनीने सरकारला दिलेला रिव्हेन्यू बघितला तर तो 6 हजार 384 कोटी रुपये इतका आहे. यात विनिंगचा चान्स बघितला तर 0.000006 टक्के एवढा आहे.
‘सोशल स्टेटसमुळे व्यसनी व्यक्ती तक्रार करत नाही’
पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडताना शिवसेनेचे (UBT) धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका आत्महत्या प्रकरणाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं.
कैलास पाटील म्हणाले, “धाराशिवमधील बावी या गावातील लक्ष्मण मारूती जाधव हा तरुण ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याने त्याने स्वत:ची शेती विकली. घर विकलं. तरी त्याचं देणं फिटत नव्हतं. म्हणून त्याने स्वत:च्या दोन वर्षांच्या मुलाची विष पाजून हत्या केली. गरोदर पत्नीची हत्या केली. नंतर स्वत: आत्महत्या केली.”
या प्रश्नाविषयी अधिक समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांंगितले की “माझ्या मतदारसंघात तसेच राज्यात हा प्रश्न अत्यंंत गंभीर बनला आहे. यावर आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येऊ शकतात यासंंदर्भात मी अभ्यास करत आहे. तेलंंगणानं यावर उपाययोजना केल्या आहेत. त्या धर्तीवर आपल्याकडे काय उपाययोजना करण्यात येतील, याबाबत मी तज्ज्ज्ञांशी चर्चा करुन लवकरच याबाबतची सविस्तर माहिती एक पत्रकार परिषद घेऊन देणार आहे.”