२० जानेवारी ते २२ जुलै २०२५ दरम्यान, १ हजार ७०३ भारतीय नागरिक अमेरिकेतून मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र राज्य मंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी लोकसभेत दिली. परतलेल्या भारतीयांमध्ये १ हजार ५६२ पुरुष आणि १४१ महिलांचा समावेश आहे.
यामधील सर्वाधिक पंजाबमधील, त्यानंतर हरियाणा आणि गुजरातमधील नागरिक आहेत.
द्रमुकच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात, परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी लोकसभेत ही आकडेवारी सादर केली. अमेरिकेतून आलेल्या भारतीयांमध्ये पंजाब (६२०), हरियाणा (६०४), गुजरात (२४५), उत्तर प्रदेश (३८), गोवा (२६), महाराष्ट्र (२०), दिल्ली (२०), तेलंगणा (१९), तामिळनाडू (१७), आंध्र प्रदेश (१२), उत्तराखंड (१२), हिमाचल प्रदेश (१०), जम्मू आणि काश्मीर (१०), केरळ (८), चंदीगड (८), मध्य प्रदेश (७), राजस्थान (७), पश्चिम बंगाल (६), कर्नाटक (५), ओडिशा (१), बिहार (१), झारखंड (१) आणि इतर सहा जणांचा समावेश आहे.
भारतीयांना मायदेशी परत पाठवताना मानवी वागणूक मिळावी यासाठी परराष्ट्र मंत्रालय अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचे मंत्र्यांनी उत्तरात म्हटले. ५ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणत्याही विमानात भारतीयांना दिलेल्या वागणुकीबाबत मंत्रालयाला कोणतीही तक्रार मिळालेली नाही, असे उत्तरात म्हटले.