सध्याच्या जीवनशैलीतला सगळ्यात महत्वाचा घटक नोकरी हा झाला आहे. वाढत्या महागाईमुळे लोकांना नोकरीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता निर्माण झाली आहे. एकीकडे देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यावर्षी आपल्या ग्लोबल वर्कफोर्समधून 12,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करत असल्याची घोषणा करत आहे.
तर दुसरीकडे इन्फोसिसने फ्रेशर्सपासून सर्वांसाठी नव्या नोकरीच्या संधी दरवाजे खुल्या केले आहेत. इन्फोसिसने यंदा सुमारे 20,000 पदवीधरांना कामावर घेण्याची योजना आखली असून, ही बातमी आयटी क्षेत्रातील तरुणांसाठी नक्कीच दिलासादायक आहे.
फ्रेशर्ससाठी सुवर्ण संधी
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी या भरतीची अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की कंपनीने यावर्षी पहिल्या तिमाहीतच 17,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्त केले असून, वर्षभरात 20,000 नव्या फ्रेशर्सना संधी दिली जाईल. ही भरती कॉलेजमधून नुकतीच पदवी घेतलेल्या तरुणांसाठी नवी आशा घेऊन येत आहे.
कामासाठी कौशल्ये
एआय आणि रीस्किलिंगच्या दिशेने कंपनीने धोरणात्मक गुंतवणूक केल्यामुळेच ही भरती शक्य झाली आहे, असं पारेख यांनी सांगितलं. त्यांच्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ऑटोमेशन आणि निर्णयक्षमतेत वाढ झाली असली तरी त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे. त्यामुळे इन्फोसिसने आतापर्यंत 2.75 लाख कर्मचाऱ्यांना विविध स्तरांवर प्रशिक्षण दिले आहे.
IT क्षेत्रात नोकऱ्यांचा कमी
कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत विचारले असता पारेख यांनी स्पष्टपणे सांगितले की, इन्फोसिसने कोणत्याही कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही. उलटपक्षी, नवीन कर्मचाऱ्यांसाठी संधी निर्माण करण्यावर कंपनीचा भर आहे. अशा वेळी जेव्हा TCSसारखी मोठी कंपनी नोकऱ्यांमध्ये कपात करत आहे. तेव्हा इन्फोसिसच्या या निर्णयामुळे आयटी क्षेत्रात स्थैर्य आणि विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे.