देशातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील दहावीच्या टॉपर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितले की, मुलगी कोचिंगला गेली होती तेव्हा 3 तरुणांनी तिचे अपहरण केले आणि आठ दिवस तिच्यावर क्रूरपणे बलात्कार केला आणि नंतर रात्रीच्या सुमारास तिला तिच्या घराजवळ सोडून ते पळून गेले. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सलग 8 दिवस झालेल्या बलात्कारामुळे या मुलीची प्रकृती खालावली आहे. तिच्यावर रीवा येथील सरकारी गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सध्या पोलिसांनी बलात्काराबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र या विद्यार्थिनीचे अपहरण झाले होते असे त्यांनी म्हटलं आहे. आता पीडित मुलीच्या जबाबानंतर या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.
ही धक्कादायक घटना सेमरिया पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. 30 जुलै रोजी सकाळी मुलगी कोचिंगसाठी घरून निघाली होती. कोचिंगनंतर ती शाळेत जात असे, मात्र कोचिंग संपताच तीन तरुणांनी तिचे अपहरण केले. मुलीच्या पालकांनी म्हटलं आहे की, आरोपी तरुणांनी तिला मादक पदार्थाचा वास दिला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिचे अपहरण करुन खोलीत डांबून ठेवण्यात आले. तसेच तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करण्यात आले. जेव्हा जेव्हा मुलगी शुद्धीवर यायची तेव्हा तेव्हा तिला मादक पदार्थाचा वास देऊन बेशुद्ध करण्यात यायचे असा आरोप पालकांनी केला आहे.
रुग्णालयात उपचार सुरू
अपहरण झाल्यापासून पालक सतत तिचा शोध घेत होते, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणी लागला नाही. कुटुंबाने पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र या मुलीचे अपहरण करणाऱ्यांनी काल रात्री तिला तिच्या घराजवळ सोडूले आणि पळून गेले. यानंतर पालकांनी गंभीर अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीला गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
दहावीच्या वर्गात टॉपर
या मुलीच्या आरोग्याबाबत बोलताना डॉ. राहुल मिश्रा म्हणाले की, तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत.’ पालकांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी ती दहावीच्या वर्गात राज्यात पहिली आली होती, त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी तिचा सन्मान केला होता. दरम्यान, गावातील एक तरुण या मुलीला त्रास देत होता, याबाबत पालकांनी त्याची तक्रारही केली होती.
पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
पोलिसांचे म्हणणे आहे की, पीडित मुगली आणि आरोपी तरुण हे मित्र होते. ही मुलगी आणि आरोपी तरुणाची पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे, ज्याच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे बलात्काराचे की सामूहिक बलात्काराचे प्रकरण आहे हे स्पष्ट होण्यास वेळ लागेल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.