स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या बऱ्याच तरुणांची सरकारी बँकेतील नोकरी पहिली पसंत ठरत असल्याचं पाहायला मिळतं. तुम्ही सुद्धा बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
आयबीपीएस (IBPS), एसबीआय (SBI), बँक ऑफ बडोदा (BOB) आणि यूनियन बँक ऑफ इंडिया सारख्या मोठ्या सरकारी बँकांमध्ये 17000 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS)
यामधील सर्वाधित रिक्त जागा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने जाहीर केलेल्या क्लर्क पदासाठी आहेत. देशभरातील बँकांमध्ये क्लर्क पदासाठी एकूण 10,277 रिक्त जागांच्या भरतीसाठी घोषणा करण्यात आली आहे. यासाठी 1 ऑगस्ट पासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 21 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्यूएशनची डिग्री असणं आवश्यक आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून क्लर्क पदासाठी 6,589 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी 6 ऑगस्टपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 26 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. कोणत्याही विषयात ग्रॅज्यूएशनची डिग्री असलेले उमेदवार यासाठी पात्र असून 20 वर्षे ते 28 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदा (BOB)
बँक ऑफ बडोदा (BOB) कडून मॅनेजर सेल्स, ऑफिसर अॅग्रीकल्चर सेल्स आणि मॅनेजर अॅग्रीकल्चर सेल्सच्या 417 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवार 26 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच, शैक्षणिक पात्रता असण्यासोबत उमेदवारांकडे सेल्स क्षेत्रात कार्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
यूनियन बँक ऑफ इंडिया
यूनियन बँक ऑफ इंडियाने वेल्थ मॅनेजर पदासाठी 250 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीए, एमएमएस, पीजीडीबीए, पीजीपीएम किंवा पीजीडिएम मध्ये दोन वर्षांच्या रेग्युलर कोर्सचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. यासाठी 25 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील आणि संबंधित क्षेत्रात कार्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल.