शिवाजी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह क्र.१ मधील एमए./एम.एस्सी. भूगोल प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वसतिगृहातील रुममध्ये ओढणीने गळफास घेवून जीवन संपविलेची घटना सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली.
गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१, रा. सांगलीवाडी, सांगली) असे तरुणीचे नाव आहे. घटनेनंतर वसतिगृहास शवागृह परिसरात आई-वडिलांसह बहिणींनी हृदय पिटाळून टाकणारा आक्रोश केला. शेंडा पार्क येथे शव विच्छेदनावेळी जोरदार विरोध केला. घटनेची राजारामपुरी पोलिसांत नोंद झाली आहे.
सांगलीवाडी येथे राहणारी गायत्री रेळेकर शिक्षणासाठी कोल्हापुरात आली होती. विद्यापीठातील भूगोल अधिविभागात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वस्तीगृहातील रूम नंबर ५४ मध्ये इतर दोन मैत्रिणींसह राहत होती. वस्तीगृहाच्या अधीक्षक डॉ.मीना पोतदार यांच्या परवानगीने गायत्री ८ ते ११ ऑगस्ट याकालावधीत सांगलीवाडीला घरी गेली होती. सोमवारी सकाळी ९ वाजता ती सांगलीवाडीहून कोल्हापुराला निघाली. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास गायत्रीने वडिलांना कोल्हापुरात पोहचल्याचा फोन केला. त्यानंतर ही वसतिगृहात परतली.
दरम्यान, भूगोल अधिविभागातील तिची मैत्रिण वर्ग संपल्यावर वसतिगृहात आली. त्यावेळी गायत्रीच्या खोलीचा दरवाजा बंद होता. तिने दारावर थाप मारुन हाक मारली, परंतु गायत्रीने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मोबाईलवर फोनही केला मात्र तिने उचलला नाही. त्यानंतर इतर मैत्रिणींच्या सहाय्याने तिने टेबलवर उभारुन दरवाज्यावरील बाजूस असलेल्या खिडकीतून खोलीत डोकावले. त्यावेळेला तिला धक्काच बसला. वस्तीगृहाच्या खोलीतील फॅनला ओढणीने गायत्रीने गळफास घेऊन जीवन संपविलेचे निदर्शनास आले. तत्काळ विद्यार्थिनी, सुरक्षारक्षकासह वसतिगृह अधीक्षक यांनी खोलीचा तोडून दरवाजा उघडला.
घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. प्रभारी पोलीस निरीक्षक सरगर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती समजताच कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी यांनी वसतिगृहाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी झालेली गर्दी हटवली. गायत्रीच्या कुटुंबियांनी वसतिगृह परिसरात आक्रोश केला. तिच्या मैत्रिणींनाही अश्रू अनावर झाले होते. जीवन संपविलेचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
अकरा वाजता ती विद्यापीठात परतली, अन्….
गायत्री ही सांगलीवाडीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील असून वडील पंढरीनाथ रेळेकर यांचा कापडाचे दुकान आहे. तिला चार बहिणी आहेत. चार दिवसासाठी ती गावी गेली होती. सोमवारी अकरा वाजता ती विद्यापीठात परतली. वडिलांना सुखरूप पोहचल्याचा गायत्रीने फोन केला. परंतु दोनच्या सुमारास मुलीने जीवन संपविलेचा फोन वडिलांना गेला. त्यामुळे आई-वडिलांसह बहिणींना धक्का बसला. गायत्रीच्या मृत्यूने वसतिगृहातही हळहळ व्यक्त होत आहे.