Mआजकाल सोशल मीडियाचा वावर प्रचंड वाढला आहे. त्याच्या गैरवापराचे अनेक किस्से आपण ऐकत असतो, पण या सोशल मीडियामुळे कोणाचे प्राण वाचले तर ? असाच एक प्रकार गाजीपूरच्या सादात भागात घडल्याचे समोर आले असून तेथे इन्स्टाग्राममुळे एक तरूणीचे प्राण वाचले. सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी 18 मिनिटांत 12 किलोमीटरचे अंतर कापले आणि मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाल्लेल्या मुलीला आरोग्य केंद्रात नेऊन तिचे प्राण वाचवले.
खरंतर, त्या मुलीने तिचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र याची माहिती लखनौमधील डिजी कार्यालयात पोहोचली आणि त्यानंतर तेथून सादत पोलिसांना याची माहिती देण्यात आली. जराही वेळ न घालवता, सादत पोलिसांनी 18 मिनिटांत मुलीचं घर गाठलं आणि तिला त्वरित उपचार दिले, ज्यामुळे तिचा जीव वाचला.
उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील सादत पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडली. प्रेमप्रकरणातील वादामुळे एका मुलीने मंगळवारी दुपारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिने मोठ्या प्रमाणात औषध घेतले आणि औषध सेवन करतानाचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडिओ अपलोड करणे यूपी पोलिसांसाठी आणि त्या मुलीसाठी वरदान ठरले.
आत्महत्येच्या या प्रयत्नाचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड होताच त्याची सूचना लखनऊ येथील यूपी डीजीपी कार्यालयात पोहोचली. याची माहिती मिळताच, यूपी पोलिस तात्काळ सक्रिय झाले आणि प्रकरणाची माहिती सादात पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सादात पोलिस जराही विलंब न करता त्या सांगितलेल्या ठिकाणी, मुलीच्या घरी पोहोचले.
18 मिनिटांत कापलं 12 किमी अंतर
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलीचे घर सादात पोलिस ठाण्यापासून 12 किलोमीटर अंतरावर होते. पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि ते अवघ्या 18 मिनिटांत तिच्या गावी पोहोचले. तिथे तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही तिच्या आत्महत्येची माहिती नव्हती आणि ती तिच्या खोलीत बेशुद्ध पडली होती. आपल्या मुलीने मोठ्या प्रमाणात औषध सेवन करून आत्महत्या केल्याचे जेव्हा तिच्या कुटुंबियांना कळलं तेव्हा प्रचंड खळबळ उडाली.
मात्र कोणताही विलंब न करता, पोलिसांनी एका महिला कॉन्स्टेबलच्या मदतीने त्या तरूणीला जवळच्या आरोग्य केंद्रात नेले जिथे डॉक्टरांनी तिच्यावर ताबडतोब उपचार सुरू केले. यानंतर, मुलगी शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर, सादात पोलिसांसोबत आलेल्या महिला कॉन्स्टेबलने मुलीला तिच्या आत्महत्येचे कारण विचारले. त्यानंतर तिने सांगितले की प्रियकराच्या बोलण्याने तिला राग आला होता म्हणून तिने हे आत्मघातकी पाऊल उचललं.तिला तिचं जीवन बेकार वाटू लागलं होतं, म्हणून तिने आयुष्य संपवण्यासाठी ते औषध प्राशन केलं होतं.
कुटुंबियांनी मानले पोलिसांचे आभार
पोलिसांनी ज्या पद्धतीने अल्पावधीत मुलीला आरोग्य केंद्रात आणले आणि तिच्यावर उपचार केले त्यामुळे मुलीचा जीव वाचला असं डॉक्टरांनी सांगितलं. मुलीचा जीव वाचल्यानंतर, तिच्या कुटुंबियांनी यूपी पोलिस आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. त्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. जर आज यूपी पोलिस नसते तर कदाचित त्यांची मुलगी या जगात नसती असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना धन्यवाद दिले.