श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर काळाने घाला घातला आहे. पाईट येथील काळूबाई महिला बचत गटाच्या महिलांना घेऊन जाणाऱ्या एका पिकअप टेम्पोचा कुंडेश्वर घाटात भीषण अपघात झाला.
या दुर्दैवी घटनेत १० महिला भाविकांचा मृत्यू झाला असून, २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. आता या दुर्घटनेतील पिकअपचा चालक ऋषिकेश रामदास करंडे (२५) याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले.
नेमकं काय घडलं?
श्रावणी सोमवारनिमित्त खेड तालुक्यातील पाईट गावातील ‘काळूबाई महिला बचत गटा’च्या सदस्या एका पिकअप टेम्पोमधून श्री क्षेत्र कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. या सर्व महिलांनी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. कुंडेश्वरला जात असताना घाटातील नागमोडी वळणावर, चढण चढताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप टेम्पो मागे आला. त्यामुळे तो सुमारे २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळला.
हा पिकअप टेम्पो दरीत कोसळताना त्याने अनेक पलट्या घेतल्या, ज्यामुळे जखमींच्या संख्येत वाढ झाली. या भीषण अपघातात १० महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर २९ महिला गंभीर जखमी झाल्या. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेदरम्याने चालकाने वेळीच उडी मारल्याने तो बचावला. या घटनेमुळे पाईट पापळवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
पांढऱ्या साड्याच दुर्दैवाने त्यांचे कफन
या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच पिकअप गाडीत गाणी म्हणत, हसत-खेळत या भगिनी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्यांचा भक्तिभावाने सुरू झालेला प्रवास क्षणात शोकांतिका ठरला. या अपघातापूर्वी त्या महिला विठ्ठलाचे नामस्मरण करत होत्या. पण त्या महिलांचा तोच क्षण शेवटचा ठरला. कुंडेश्वर अपघातातील सर्व महिला या पाईट पापळवाडी गावातील काळूबाई महिला बचत गटाच्या सदस्या होत्या. कुंडेश्वर देवस्थानाच्या दर्शनासाठी जायचे म्हणून त्यांनी सुमारे आठवडाभरापूर्वीच पाईटमधील एका कपड्याच्या दुकानातून पांढऱ्या रंगाच्या व त्यावर हलके डिझाइन असलेल्या सुमारे पन्नास साड्या खरेदी केल्या होत्या. याच पांढऱ्या साड्या परिधान करून या सर्व महिला कुंडेश्वर दर्शनाला निघाल्या होत्या. मात्र दर्शनापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने या पांढऱ्या साड्याच दुर्दैवाने त्यांचे कफन झाल्या.
मृत महिलांची नावे
मंदाबाई कानीफ दरेकर (वय ५०)
संजाबाई कैलास दरेकर (वय ५०)
मिराबाई संभाजी चोरी (वय ५०)
शोभा ज्ञानेश्वर पापळ (वय ३३)
सुमन काळूराम पापळ (वय ५०)
शकुबाई तान्हाजी चोरघे (वय ५०)
शारदा रामदास चोरघे (वय ४५)
बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर (वय ४५)
पार्वतीबाई दत्तू पापळ (वय ५६)
फसाबाई प्रभू सावंत (वय ६१)
मृतांना कितीची मदत?
या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाख रुपये आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच या सर्व अपघातग्रस्त महिलांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. या दुःखद घटनेमुळे पाईट पापळवाडी गावात शोककळा पसरली असून, आज दिवसभर गाव बंद ठेवण्यात आले आहे.
चालकावर गुन्हा दाखल
या अपघाताच्या प्रकरणी पिकअप टेम्पो चालक ऋषिकेश रामदास करंडे (वय २५) याच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. तसेच मृतांचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह पाच ते सहा रुग्णवाहिकांमधून पाईट येथील पापळवाडीमध्ये नेण्यात आले. यानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सर्व मृतांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.