रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्या एसटी महामंडळासाठी ‘अच्छे दिन’ घेऊन आल्या आहेत. ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत प्रवाशांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने महामंडळाच्या तिजोरीत तब्बल १३७ कोटी ३७ लाख रुपयांची भर पडली आहे.
विशेष म्हणजे, ११ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून एसटीने या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा विक्रम नोंदवला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या यशाबद्दल बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, “दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीज या सणांच्या काळात एसटीला विक्रमी उत्पन्न मिळते. या दिवसांत भाऊ-बहिणींच्या प्रवासाची मोठी गर्दी असते. यंदाही प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या विश्वासामुळे महामंडळाने उत्पन्नाचा नवा उच्चांक गाठला आहे.”
चार दिवसांतील कमाईचा तपशील:
शुक्रवार: ३० कोटी ०६ लाख रुपये
शनिवार (रक्षाबंधन): ३४ कोटी ८६ लाख रुपये
रविवार: ३३ कोटी ३६ लाख रुपये
सोमवार: ३९ कोटी ०९ लाख रुपये (विक्रमी उत्पन्न)
या चार दिवसांत एकूण १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीने सुरक्षित प्रवास केला. विशेष म्हणजे, यामध्ये तब्बल ८८ लाख महिला प्रवाशांचा समावेश होता, जे ‘महिला सन्मान योजने’च्या यशाचे द्योतक आहे. प्रवाशांनी दाखवलेल्या या प्रचंड प्रतिसादाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व प्रवासी आणि अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.