दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने 10 ऑगस्टला 17 धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 12 ऑगस्ट रोजी डेवाल्ड ब्रेव्हीस याच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर कांगारुंवर करो या मरो या सामन्यात 53 धावांनी शानदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह कांगारुंचा हिशोब बरोबर करत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
त्यामुळे आता तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासह कोणता संघ मालिका आपल्या नावावर करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. टी 20i मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 16 ऑगस्टला होणार आहे. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत दुप्पटीने वाढ झाली आहे.
तिसऱ्या टी 20i सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाचे तब्बल 3 खेळाडू दुखापतीच्या जाळ्यात अडकले आहेत. दुखापतीमुळे या तिन्ही खेळाडूंना उर्वरित टी 20i सामन्यासह एकदिवसीय मालिकेलाही मुकावं लागलं आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
दुखापतीमुळे ऑलराउंडर मिचेल ओव्हन, वेगवान गोलंदाज लांस मॉरीस आणि ऑलराउंडर मॅथ्यू शॉर्ट या त्रिकुटालाअंतिम टी 20i सामन्यासह एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. दुखापतीमुळे या तिघांपैकी कुणाची पदार्पणाची संधी हुकली तर कुणाला कमबॅकसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
मिचेल ओव्हन
ओव्हनने स्वत:ला टी 20 मध्ये सिद्ध केलंय. मात्र ओव्हनला पाठीच्या दुखापतीमुळे एकदिवसीय पदार्पणासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. दुसऱ्या टी 20i सामन्यादरम्यान ओव्हनच्या हेल्मेटला बॉल लागला होता. ओव्हन त्यानंतरही खेळला. मात्र पुन्हा ग्रिलवर बॉल लागल्याने ओव्हनला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळ ओव्हनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.
लांस मॉरिस
लांस मॉरिस वनडे सीरिजमध्ये खेळणार असल्याचं निश्चित होतं. मॉरिसचं या मालिकेतून कमबॅक होणार होतं. मात्र दुखापतीमुळे मॉरिसची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. मॉरिस पाठदुखीमुळे पहिल्या 2 टी 20i सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. मात्र आता मॉरिसची पर्थमध्ये तपासणी केली जाणार आहे.
मॅथ्यू शॉर्ट
मॅथ्यू शॉर्ट याला विंडीज विरूद्धच्या मालिकेत त्रास जाणवला होता. मात्र मॅथ्यू दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे सीरिजआधी मॅथ्यू फिट होईल, अशी आशा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही.