गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने कुंभारवाड्यात मूर्तीकार मोठ्या गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. मात्र, हवामानामुळे मूर्तीकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वखनगरीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडप उभारणीच्या कामाला वेग आल्यामुळे कार्यकर्त्यांची लगवग दिसू लागली आहे.
आठ दिवसावर गणेश चतुर्थी आली असून घरगुती गणेशमुर्तीची रंगरंगोटी जवळपास पूर्ण झाली असून मोठ्या गणेशमुर्तीच्या रंगरंगोटीच्या कामाला गती येऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने मूर्ती रंगविताना मूर्तीकारांना अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. शहरातील सार्वजनिक मंडळांकडून मंडप उभारणीच्या कामाला गती बेऊ लागली आहे. कलानगरमधील महागणपती मंडळासह काही मंडळांनी प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती साकारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. याशिवाय काही मंडळांकडून गणेशमूर्तीची उंची पाहून मंडप उभारणी करताना दिसत आहेत. त्यादृष्टीने भव्य मूर्तीच्या स्थापनेसाठी मजबूत आणि सुरक्षित मंडपांची उभारणी केली जात आहे. यामध्ये गावभागातील राणाप्रताप मंडळ, गांधी कॅम्प मंडळ, सरस्वती मार्केट, धार ग्रुप, मंगळवार पेठ मंडळ, धान्य ओळयेथील शहिद भगतसिंग मंडळ बासह अनेक प्रमुख मंडळांनी मंडप उभारणीला वेग दिला आहे.