साताऱ्यात रिक्षा चालकाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेल्याची घटना घडली. साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडोबा माळपासून मार्केट यार्डपर्यंतचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेत महिला पोलीस कॉन्स्टेबल रक्तबंबाळ झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दारुच्या नशेत टल्ली झालेल्या रिक्षावाल्याला अटकाव करताच चालकाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
महिला पोलिसाला फरफटत नेणाऱ्या रिक्षा चालकाला पकडून नागरिकांनी चोप दिला. नंतर या ठिकाणी पोलीस आल्यानंतर त्यांनी त्या रिक्षाचालकाला अटक केली. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं.
दारू पिऊन रिक्षा चालवली म्हणून महिला पोलीस कॉन्स्टेबललने त्या रिक्षा चालकाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या दारुड्या रिक्षाचालकाने त्या महिला कर्मचाऱ्यालाच फरफटत नेले. सुमारे शंभर ते दोनशे मीटर त्या महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेण्यात आलं. या घटनेत ती महिला कॉन्स्टेबल चांगलीच जखमी झाली असून ती रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आलं.
या दरम्यान त्या रिक्षाचालकाने तीन ते चार गाड्यांनाही धडक दिली. महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेत असताना त्या रिक्षाचालकाला अडवण्यासाठी काही नागरिकांनी प्रयत्न केला. नागरिकांनी त्या रिक्षाचालकाला पकडलं आणि चांगलाच चोपही दिला.
या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. तसेच जखमी महिला कॉन्स्टेबलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृत्ती सध्या स्थिर आहे.