पावसाने राज्यात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सर्वच ठिकाणी पावसाची तुफान बॅटिंग चालू आहे.
या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह राज्याच्या इतरही भागात लाखो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेले आहे. तर मुंबई आणि उपनगरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. या पावसामुळे मुंबईची लोकलही स्लो झाली आहे. अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. दरम्यान, सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेऊन शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत शाळा बंद असणार आहेत.
विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय
मुंबईत पुढचे 12 तास मुसळधार पाऊस असणार आहे. तसेच पुढच्या 48 तासांत मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे उपनगरांतही आगामी तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच त्या-त्या जिल्हा प्रशासनांनी शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्याचा पाऊस पाहता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता अनेक जिल्ह्यांत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसा सरकारी आदेश निघाला आहे.
कुठे कुठे शाळा असणार बंद?
मिळालेल्या माहितीनुसार सध्या घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ठाण्याच्या मनपा हद्दीतील सर्व शाळा बंद असणार आहेत. तसेच कल्याण डोंबिवलीतील शाळाही पावसामुळे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मीरा भाईंदरमध्येही शाळांना सुट्टी
मीरा भाईंदर पालिका हद्दीतही मुसळधार पाऊस चालू आहे. हवामान खात्याने या भागाला रेड अलर्ट जारी केला आहे. हीच बाब लक्षात घेता मीरा भाईंदरचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी मीरा-भाईंदरमधील प्राथमिक, माध्यमिक शाळांना पत्रक सुट्टी जाहीर केली आहे. तसे पत्रक त्यांनी काढले आहे.
मुंबईतील शाळांनाही सुट्टी
मुंबईतील सध्याची पावसाची स्थिती पाहता मुंबई महापालिका परिक्षेत्रातील खासगी, विनाअनुदानित, खासगी अनुदानित अशा सर्वच प्रकारच्या माध्यमिक व प्रथामिक शाळांना 19 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शाळांच्या सुट्टीबाबत फडणवीस काय म्हणाले होते?
दरम्यान, याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीचा विचार करून शाळांना सुट्टी जाहीर करायची की नाही, हे ठरवले जाईल असे सांगितले होते. त्यानंतर आता काही जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.