१९ ऑगस्ट रोजी आज शेअर(stocks) बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा एकदा शेअर बाजार सपाट पातळीवर उघडणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत संमिश्र कल दिसून येत असल्याने, भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी किरकोळ सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९८८ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २१ अंकांनी जास्त होता. सोमवारी, देशांतर्गत शेअर(stocks) बाजारात तेजी दिसून आली, दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांनी जवळजवळ १% वाढ नोंदवली. सेन्सेक्स ६७६.०९ अंकांनी म्हणजेच ०.८४% ने वाढून ८१,२७३.७५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २४५.६५ अंकांनी म्हणजेच १.००% ने वाढून २४,८७६.९५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ३९३.०५ अंकांनी किंवा ०.७१% ने वाढून ५५,७३४.९० वर बंद झाला.
आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार झाले, तर अमेरिकन शेअर बाजारात रात्रीपासून फारसा बदल झाला नाही, तिन्ही अमेरिकन बेंचमार्क निर्देशांक स्थिर राहिले. सोमवारी, भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त तेजी दाखवली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जीएसटी सुधारणांची घोषणा, एस अँड पी ग्लोबलने भारताच्या क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या संभाव्य समाप्तीबद्दल आशावाद यामुळे शेअर बाजारात सकारात्कम बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना तीन स्टॉकची खरेदी-विक्री करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये UTI AMC, नायका आणि ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीज, वेदांत, व्होडाफोन आयडिया, हिंदुस्तान झिंक, ग्लेनमार्क फार्मा, जीएमआर विमानतळ, ट्रेंट, टाटा स्टील, एस्कॉर्ट्स कुबोटा, ओएनजीसी या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, जेटीएल इंडस्ट्रीज आणि श्रीराम प्रॉपर्टीज हे शेअर्स १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना पाच ब्रेकआउट स्टॉकची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग, फिएम इंडस्ट्रीज , कामत हॉटेल्स (इंडिया), नेस्को आणि एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया आणि आनंद राठीचे तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी आज गुंतवणूकदारांना पाच इंट्राडे स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड, सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड, कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड, प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे.
(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)