जळगावमधील एरंडोल तालुक्यातील खेडी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खेडी गावाजवळील एका शेतात या पाचही जणांचे मृतदेह आढळले आहेत. शेताकडे जात असताना विजेचा धक्का लागल्याने या सर्वांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण शेतात काम करण्यासाठी जात होते. त्यावेळी विजेचा धक्का लागून या सर्वांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत ४० वर्षांच्या दोन महिला, ४५ वर्षांचा एक पुरुष, सहा वर्षांची एक मुलगी आणि आठ वर्षांचा एक मुलगा अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाले. हे कुटुंब आदिवासी पावरा समाजाचे होते अशी माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेतून याच कुटुंबातील तीन वर्षांची एक मुलगी सुखरूप बचावली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या मृतांची नावे निष्पन्न करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अहिल्यानगरात पाच जणांचा मृत्यू
दरम्यान दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर हादरले होते.
नेवासा फाटा येथे कालिका फर्निचर या दुकानात मध्यरात्री अचानक आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, कूलर, फ्रीज, सोफा आणि इतर वस्तू असल्याने आगीने लगेचच रौद्ररूप धारण केले. आगीमुळे सर्वत्र धुराचे मोठे लोळ पसरले. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर रासने कुटुंब राहत होते. रात्रीच्या गाढ झोपेत असताना आगीचा धूर त्यांच्या घरात शिरल्यामुळे श्वास गुदमरून कुटुंबातील पाच सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मरण पावलेल्यांमध्ये मयूर अरुण रासने (४५), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (३८), दोन मुले अंश (१०) आणि चैतन्य (७) आणि वृद्ध आजी सिंधुबाई चंद्रकांत रासने (८५) यांचा समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.