आशिया कप 2025 स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे. सू्यकुमार यादव कर्णधार, तर शुबमन गिल उपकर्णधार आहे. तर काही खेळाडूंची नावं अपेक्षेप्रमाणे संघात आहेत. असं असताना काही खेळाडूंना संघात स्थान न दिल्याने गदारोळ झाला आहे. यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर यांची नाव वगळल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. त्यामुळे आजी माजी खेळाडूंनी प्रश्नांचा भडिमार सुरु केला आहे. असं असताना आर अश्विनने देखील टीकास्त्र सोडलं आहे. या दोन खेळाडूंना डावलल्याने त्याने राग व्यक्त केला आहे. आर अश्विनने ‘ऐश की बात’ या आपल्या युट्यूब चॅनेलवरील कार्यक्रमात सांगितलं की, निवड ही अशी गोष्ट आहे की त्यात कोणीतरी बाहेर असेल. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी चर्चा करता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आणि दु:ख पाहू शकता. आशा आहे की, कोणीतरी श्रेयस आणि जयस्वालसोबत चर्चा केली असेल.
आर अश्विनने पुढे सांगितलं की, ‘जेव्हा तुमच्याकडे तिसरा सलामी फलंदाज म्हणून जयस्वाल आहे. तेव्हा तुम्ही वर्ल्डकप विजेत्या संघातील एकाला हटवून शुबमन गिलला आणलं. मी शुबमन गिलसाठी खूश आहे. पण श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वालसाठी दु:खी आहे. दोघांबरोबर ठीक झालं नाही.’ आर अश्विन इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुढेही याबाबत आपलं मत मांडलं. ‘अय्यरचा रेकॉर्ड बघा. टीममधून बाहेर गेला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी चांगली फलंदाजी केली. त्याने स्पर्धेत जिंकून दिलं. जर उत्तर असं असेल की शुबमन गिल चांगल्या फॉर्मात आहे, तर अय्यरही आहे. जयस्वालने ओव्हलवर शेवटच्या सामन्यात कठीण खेळपट्टीवर चांगली फलंदाजी केली. त्याचं काय उत्तर असेल.’
अश्विनने पुढे सांगितलं की, श्रेयस अय्यरची काय चूक आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. त्याला लिलावात उतरवलं. त्यानंतर पंजाब किंग्सला 2014 नंतर पहिल्यांदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं. त्याने शॉर्ट बॉल खेळण्याची कमकुवत बाजू सुधारली. कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजांपुढे आयपीएलमध्ये धावा काढल्या. मी त्याच्यासाठी आणि जयस्वालसाठी दु:खी आहे.