बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती. मात्र मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. या निवडणूकीत शशांक राव यांच्या पॅनलचे 14 उमेदवार निवडून आले आहेत. तसेच प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले आहेत. अशातच आता ठाकरे बंधुंच्या या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
पुण्यात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधुंच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीतील पराभवाबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझं हे मत होतं की, अशाप्रकारच्या पतपेढीच्या निवडणूकीचे राजकीयकरण करु नये. मात्र ठाकरे बंधुंनी त्याचं राजकारण केलं. शशांक राव आणि प्रसाद लाड हे आमचे नेते आहेत, मात्र आम्ही राजकीयकरण केलं नाही.’
पुढे बोलताना, ‘आता दोन ठाकरे बंधु एकत्र आले, आता ठाकरे ब्रँण्ड निवडून येणार असं त्यांनी राजकीयकरण केलं. मात्र हे राजकीयकरण लोकांना आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे त्यांना एकही जागा मिळालेली नाही, या निवडणूकीत तरी त्यांना लोकांनी रिजेक्ट केलं आहे असं चित्र दिसत आहे’ असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.
आशिष शेलार यांचा ठाकरे बंधुंना टोला
बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले की, ‘आता भूमिका स्पष्ट झाल्या आहेत भाजप पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो नव्हतो. ही निवडणूक कामगारांची होती बेस्ट वर प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. याचं राजकीय करण उबाठा आणि मनसेने केले. प्रत्येक गोष्टीच राजकारण करण याच फळ त्यांना मिळालं आणि हाती भोपळा आला. 0 + 0 हा शून्यच हे मी आधीही म्हणालो होतो. आज मुंबईचा विजय झाला, मुंबईकरांचा विजय झाला, मराठीचा विजय झाला, कामगारांचा विजय झाला.
शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्यावर महत्वाची जबाबदारी
पुढे बोलताना शेलार म्हणाले की, ‘मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी आज जाहीर करतो की, मुंबई महानगरपालिकेच्या स्टार प्रचारकांची मोठी यादी जाहीर होईलच, पण स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांची नावे मी आज जाहीर करत आहे. या दोघांनीच बेस्टच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे हे दाखवून दिले.’